या विश्वविजयानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघावर अधिक जबाबदारी आली आहे. जगातील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून सातत्य राखणे, नवीन खेळाडूंना संधी देणे, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्चस्व टिकवणे ही पुढची आव्हाने असतील.

भारतीय महिला क्रिकेट वीरांगनांनी अखेर अपेक्षित असा पराक्रम केलाच. ४७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर तो ऐतिहासिक क्षण आला. भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच महिला क्रिकेटचा विश्वचषक जिंकला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आणखीन एका सोनेरी पानाची भर पडली. दोनवेळा हातातून निसटलेला विश्वचषक पुन्हा एकदा निसटणार नाही, याची दक्षता हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने घेतली आणि महिला क्रिकेट विश्वचषकावर अखेर भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर कार्तिकी एकदशीच्या रात्री भारतीय महिलांनी हा दिमाखदार विजय मिळवल्यानंतर देशभर पुन्हा एकदा लोकांनी दिवाळी साजरी केली. महिलांनी मिळवलेल्या या अद्भुत विजयामुळे स्वाभाविकच संपूर्ण देश आनंदात न्हाऊन गेला. भारतीय महिलांचा हा केवळ विजयच नव्हे तर भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या युगाची ही सुरुवात झाली आहे, असे मी म्हणेन. महिला क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता रविवारी मिळाला. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यापुरतेच आतापर्यंत मर्यादित असलेल्या या जगात भारतीय महिलांनीही अधिकाराने आणि दिमाखाने प्रवेश केला आहे आणि हा प्रवेश म्हणजे भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या पर्वाची नांदी म्हणता येईल.
आठ वर्षांपूर्वी लंडनमधील ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावर केवळ नऊ धावा कमी पडल्याने हा झळाळता विश्वचषक इंग्लंडच्या हवाली करून आम्हाला निराशेने मायदेशी परतावे लागले होते. त्यानंतर आठ वर्षे अर्थातच थांबावे लागले असले, तरी हा सुवर्ण क्षण लवकरच भारतीय क्रिकेटमध्ये येणार असल्याची ग्वाही भारतीय महिलांनी तेव्हाच दिली होती. हा मार्ग तसा खडतरच होता, पण भारतीय महिलांनी त्यातूनही वाट काढत शिखर गाठले आणि क्रिकेटचे अनभिषिक्त सम्राट म्हणून जग आज आमच्याकडे आता पाहू लागले आहे. आपल्या महिला संघाची ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी तशीच अभिमानास्पद ठरावी, जशी १९८३ मध्ये कपिल देवच्या संघाने इंग्लंडमध्ये लॉर्डस् मैदानावर पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्या विजयाने भारतीय पुरुष क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला, हे तर मागील काही वर्षांपासून सारे जग पहात आहे. आता या विजयानंतर महिला क्रिकेटलाही नवसंजीवनी मिळेल आणि आमच्या क्रिकेट वीरांगना षुरुष क्रिकेटवीरांच्या खांद्याला खांदा भिडवून भारतीय क्रिकेटचा डंका जगभर पिटवतील, अशी आशा निश्चितच बाळगता येईल.
या विश्वविजयानंतर भारतीय महिला क्रिकेटला नवे आयाम प्राप्त झाले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठीही भारतीय संघ आता प्रबळ दावेदार मानला जात आहे. २०२३ मध्ये भारताने जेव्हा १९ वर्षांखालील महिला विश्वचषक जिंकला होता, तेव्हाच या यशाची पायाभरणी झाली होती. भारताचा हा विजय केवळ खेळातील यश नाही, तर भारतीय स्त्रीशक्तीचा जागतिक स्तरावर झालेला भव्य जयघोष आहे. या विजयाने केवळ क्रिकेटचेच नव्हे, तर भारतीय स्त्रीशक्तीचेही नवे पर्व सुरू केले असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. हा विजय केवळ एका स्पर्धेतील यश नाही, तर भारतीय महिला क्रिकेटच्या दीर्घ संघर्षाचा, जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा परिपाक आहे.
ही स्पर्धा भारतीय महिला संघासाठी तशी सोपी मुळीच नव्हती. प्रारंभीच्या काही सामन्यांत पदरी अपयश, चुकलेल्या संधी, आणि वाढते दडपण यामुळे संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पण ज्या पद्धतीने खेळाडूंनी परिस्थितीला तोंड दिले, ती त्यांची खरी जिद्द दाखवणारी गोष्ट ठरली. शेफाली वर्माने तिच्या धडाकेबाज फलंदाजीने विरोधकांना गारद केले, स्मृती मंधानाने तांत्रिक खेळाची शाळाच घातली, तर दीप्ती शर्माच्या फिरकीने सामन्याचे पारडे भारताकडे वळवले. भारताच्या पुरुष संघातील शर्मा आणि वर्मा हे क्रिकेटपटू प्रतिस्पर्धी संघांसाठी कायमचे डोकेदुखी बनून राहिल्याचे चित्र आम्ही नेहमीच पाहतो. महिला संघातही शर्मा - वर्मा याच नावांच्या खेळाडूंनी भार उचलावा, हा योगायोग म्हणावा लागेल. दीप्ती आणि शेफाली तेच काम भारतीय महिला संघातून करत आहेत. हरमन आणि जेमिमा रॉड्रिक्स यांचा उल्लेख नाही केला तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल. सगळेच मॅच विनर असल्याने सांघिक कामगिरीतूनच हे सारे साध्य झालेले आहे. संघभावनेचा उत्तम संगम झालेला येथे दिसला आणि तीच खूप मोठी उपलब्धी ठरली आहे.
हा विजय महिला क्रिकेटसाठी नवे पर्व घेऊन आला आहे. एकेकाळी अल्पसंख्य प्रेक्षकांसमोर खेळले जाणारे सामने आता हाऊसफुल्ल स्टेडियममध्ये होत आहेत. प्रसारमाध्यमे, प्रायोजक आणि चाहत्यांचे लक्ष आता महिला क्रिकेटकडे वळले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गेल्या काही वर्षांत घेतलेल्या सकारात्मक निर्णयांचा यशस्वी परिणामही यात दिसून येतो - समान मॅच फी, महिला आयपीएल स्पर्धा, व्यावसायिक कोचिंग सुविधा आणि ग्रामीण भागांतून उदयास येणाऱ्या खेळाडूंसाठी अकॅडमी. पण या विश्वविजयानंतर अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. आता देशभरात महिला क्रिकेटसाठी अधिक सुविधायुक्त केंद्रे उभारली जाणे आणि मुलींना खेळात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे अत्यावश्यक ठरणार आहे. हा विजय भारतीय महिला क्रिकेटच्या विकासाचा प्रारंभ आहे. बीसीसीआयने आता दीर्घकालीन नियोजन करून देशभर प्रशिक्षण केंद्रे, शाळा-स्तरावरील स्पर्धा आणि ग्रामीण भागात संधी निर्माण करणे आवश्यक आहे. या विजयाचे महत्त्व केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित नाही. हे यश भारतीय समाजातील महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. क्रिकेटसारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात भारतीय महिलांनी स्वतःचे अधिराज्य सिद्ध केले आहे. त्यांच्या प्रत्येक फटक्याने, प्रत्येक विकेटने, आणि प्रत्येक उत्साहाने समाजाला एक संदेश दिला आहे- की स्त्रिया संधी मिळाल्यास कोणत्याही क्षेत्रात जग जिंकू शकतात. या विजयाने लहान गावांतील, शाळा-महाविद्यालयांतील असंख्य मुलींना नवे स्वप्न दिले आहे. आता पालक आपल्या मुलींना बॅट हातात घेऊन मैदानात उतरायला प्रोत्साहित करतील. हा बदल भारतीय समाजाच्या मानसिकतेत झालेला सर्वात मोठा विजय म्हणावा लागेल. हा प्रवास आपल्याला शिकवतो की यश हे एका क्षणाचे फळ नसते, ते अनेक वर्षांच्या प्रयत्नांचे, त्यागाचे आणि न थांबणाऱ्या जिद्दीचे परिणाम असते. या विश्वविजयानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघावर अधिक जबाबदारी आली आहे. जगातील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून सातत्य राखणे, नवीन खेळाडूंना संधी देणे, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्चस्व टिकवणे ही पुढची आव्हाने असतील. सरकार, बीसीसीआय आणि राज्य संघटनांनी महिला क्रिकेटच्या विकासासाठी अधिक संसाधनांचा वापर केला, तर पुढील दशक हे भारतीय महिला क्रिकेटचे सुवर्णयुग ठरेल.

वामन प्रभू
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९