भारतीय महिला क्रिकेट संघाने जी कामगिरी केली आहे, ती क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच मुलींना प्रभावित करणारी आणि प्रोत्साहित करणारी आहे. महिला क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे, हेही आता अधोरेखित झाले आहे.

परवाच ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉटसीटवर बसलेल्या परिमा जस्वाल या मुलीबद्दल तिची आई सांगत होती ‘ही मुलींसारखी राहत नाही, मुलांसारखी खेळत असते.’ पण त्या आईचे आणि तिच्या मुलीचे असलेले सुंदर बॉंडिंगही या खेळाच्या वेळी दिसून आले. आईचा पाठिंबा असल्यामुळेच ती खेळू शकली. अमिताभ बच्चन जेव्हा विचारतात की, पुढे काय व्हायचे आहे, त्यावर ती मुलगी सांगते की तिला तपास अधिकारी व्हायचे आहे. मुली आपला निर्णय घेत आहेत आणि त्यांना आवड असलेल्या गोष्टी करू दिल्या, तर निश्चितच त्या काही तरी वेगळे करून दाखवतात. असे कुठलेच क्षेत्र राहिलेले नाही, जिथे महिलांनी आपले वर्चस्व सिद्ध केलेले नाही. सगळ्या गोष्टींवर पुरुषांचीच मक्तेदारी आहे, असा काहींचा गैरसमज असतो. काही पालकांचाही. त्यामुळे अनेकदा मुलींनी खेळण्यासाठी परवानगी मागितली आणि तेही क्रिकेट खेळण्यासाठी, तर अनेक जण नकारार्थी सूर लावतात. घरातही मुलगा असेल तर त्याला फिरण्यासाठी खेळण्यासाठी मर्यादा नसतात. तो सांगेल त्याला प्राधान्य मिळते. किंबहुना त्याला परवानगीही लागत नाही. पण मुलींना मात्र ठोकळेबाज गोष्टींमध्ये बांधून ठेवावे, असे बहुतेकांना वाटते. समाज काय म्हणेल अशा विचित्र समजामध्ये अनेक पालक राहतात. यातून किती तरी मुलींच्या भावना, स्वप्ने पूर्णत्वास येण्याआधीच संपतात. पण बंधने तोडून पुढे जाणाऱ्यांसाठीच आकाशही ठेंगणे होते. बंधनांमध्ये गुरफटून राहिल्या असत्या, तर रविवारी डी. वाय. पाटील मैदानावर भारताच्या निळ्या जर्सीतील मुली क्रिकेट विश्वावर राज्यही गाजवू शकल्या नसत्या.
शेफाली वर्मा, राधा यादव, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, अमनजोत कौर, ऋचा घोष, श्री चरणी, दीप्ती शर्मा यांनी भारतीय महिला क्रिकेट संघ काय करू शकतो ते दाखवून दिले. इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने विश्वचषकाला गवसणी घातली. महिला क्रिकेट विश्वचषक सुरू होऊन ४२ वर्षे उलटली. इतक्या वर्षांनंतर विश्वचषकावर भारताला आपले नाव कोरता आले, ते या मुलींच्या धडाकेबाज खेळामुळे. भारतात पुरुष क्रिकेट संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता, त्यानंतर महिला संघाने दुहेरी आनंद साजरा करण्याची संधी भारतीय प्रेक्षकांना दिली. ऑस्ट्रेलियाच्या संघाला उपांत्य फेरीत आणि दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत हरवून विश्वचषकावर नाव कोरले. देशासाठी ही स्वप्नपूर्तीच होती. प्रथमच भारत विश्वविजेता ठरला. यापूर्वी २००५ आणि २०१७ मध्ये अंतिम सामन्यात पराभूत होऊन दोन वेळा विश्वचषकाचे स्वप्न अधुरे राहिले होते. किती तरी महिला खेळाडूंनी विश्वचषकाचे स्वप्न पाहून दरवेळी स्पर्धेत जीवाचे रान केले, पण त्या सर्वांचे स्वप्न हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने आज पूर्ण केले. आतापर्यंत भारतीय संघात खेळलेल्या आणि क्रिकेटसारख्या खेळाकडे सकारात्मकदृष्ट्या पाहणाऱ्या सर्वच महिला खेळाडूंचा हा विजय आहे.
भारतात आता क्रिकेटचे चित्र हळूहळू बदलत आहे. महिला प्रिमियर लीगची सुरुवात झाल्यामुळे अनेक मुलींना आपली चमक दाखवण्याची संधीही मिळत आहे. विश्वविजेता ठरलेल्या महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदारही हे मान्य करतात. आपण आल्यानंतर दोन डब्ल्यूपीएल झाल्या, ज्यातून चांगल्या खेळाडूंना पारखून घेता आले, असे ते सांगतात. भारतीय महिला क्रिकेट संघाने जी कामगिरी केली आहे, ती क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच मुलींना प्रभावित करणारी आणि प्रोत्साहित करणारी आहे. महिला क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे, हेही आता अधोरेखित झाले आहे. एक काळ होता ज्यावेळी महिला क्रिकेट संघाला पुरस्कर्ते मिळत नव्हते. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. बीसीसीआय महिला संघाच्या पाठीशी असल्यामुळे आणि गेल्या काही वर्षांमध्ये भारतात महिलांमध्ये क्रिकेटची क्रेझ निर्माण होऊ लागल्यामुळे हा संघही भविष्यात चांगलीच कामगिरी करत राहील, यात शंका नाही. डब्ल्यूपीएलच्या माध्यमातून यापुढेही देशातील चांगल्या महिला खेळाडूंना संधी मिळत राहील. त्यातूनच भारतीय संघात शेफाली वर्मासारख्या मुलींची निवड होईल. या संघाने खेळून आणलेला विजय हा भारतासाठी आतापर्यंत खेळलेल्या, ज्यांचे विश्वचषक मिळवण्याचे स्वप्न होते त्या सर्व महिला खेळाडूंचाही आहे. भारतीय महिला संघ या टप्प्यापर्यंत येण्यासाठी भूतकाळात अनेक भारतीय महिला खेळाडूंनी योगदान दिले आहे. त्या सर्वांच्या मेहनतीचे चीज आज भारतीय महिला क्रिकेट संघाने केले. या एका विश्वचषकाने भारतातील पालकांनाही मुलींच्या खेळाबाबत आपली मानसिकता बदलण्यासाठी कारणीभूत ठरो, हीच अपेक्षा.