
गोव्यातील रस्त्यांवर मोकाट गुरांचा धोका दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. रस्त्यांवर मुक्तपणे फिरणाऱ्या या गुरांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे. नुकताच काणकोण भागात झालेल्या अशाच एका अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. अनेक रस्त्यांवर रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने मोकाट गुरे भटकत असल्याने अपघात वाढले आहेत. वारंवार मागणी होत असूनही, या गुरांच्या मालकांवर कोणतीही कठोर कारवाई होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पूर्वी केवळ ग्रामीण भागातील रस्त्यांवर असणारी गुरे आता शहरी भागात, महामार्गावर, समुद्रकिनाऱ्यावर बिनधास्तपणे फिरत आहेत.
मागील काही वर्षांची आकडेवारी पाहता राज्यात २०१९ ते २०२४ दरम्यान भटक्या गुरांमुळे ७३ अपघात झाले होते. यामध्ये १३ व्यक्तींचा तसेच १९ जनावरांचा मृत्यू झाला होता. याआधी पोलीस दलाने पशुंवर्धन खात्याला राज्यभरातील भटक्या गुरांच्या जागा कळवल्या होत्या. वाहतूक पोलीस विभागाने उत्तर गोव्यातील ५५ तर दक्षिण गोव्यातील ९१ ठिकाणी भटकी गुरे रस्त्यावर ठाण मांडून बसतात असे कळवले होते. अशा जनावरांना रस्त्यावरून हटवण्याची विनंती देखील वाहतूक पोलिसांनी केली होती. यानंतर मोकाट गुरांच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंवर्धन खात्याने सप्टेंबर २०२४ मध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.
यामध्ये कामधेनू अथवा पशुपालन योजनेअंतर्गत घेतलेली गुरे सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर भटकताना सापडल्यास लाभार्थ्यांना देण्यात आलेले सर्व अनुदान सरकार परत वसूल करून घेण्याची तरतूद होती. अशा व्यक्तींना भविष्यात पशुसंवर्धन खात्याच्या कोणत्याही योजनांचा लाभ न देता त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार होते. यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये देखील खात्याने रस्त्यावरची खासगी मालकीची गुरे जप्त करून घेण्याचा इशारा दिला होता. सध्या रस्त्यावरची भटक्या गुरांची संख्या पाहता हे नियम केवळ कागदावरच आहे का, अशी शंका उपस्थित होते.
गुरांचे मालक गुरांचे योग्य पालनपोषण न करता त्यांना निष्काळजीपणे रस्त्यांवर सोडून देत आहेत. परिणामी, रस्त्यांवरील भटक्या गुरांची संख्या नियंत्रणात आलेली नाही आणि अपघातांचे सत्र सुरूच आहे. गुरांच्या मालकांचे हे निष्काळजी कृत्य अत्यंत घातक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने लाभार्थ्यांची पाहणी करणे, ज्यांची गुरे रस्त्यावर मोकळी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करणे, त्यांना दिलेले अर्थसहाय्य त्वरित परत घेणे, अशा उपाययोजना केल्यास रस्त्यांवरील भटक्या गुरांची संख्या नक्कीच कमी होईल. अशा गुरांना त्वरित नियंत्रणात आणल्यास भविष्यात होणारे अनेक जीवघेणे अपघात टळू शकतील.
- पिनाक कल्लोळी