हे गुरुराया, तारुण्य-संपन्न अशा 'तुरीय-अवस्थे'चे लालन तू करतोस. सकळ विश्वाचे पालन तू करतोस. मांगल्य-रत्नांची तूच एकमेव ठेव आहेस आणि एकमात्र पूजनीय देव ही तूच आहेस.

इथे नववा अध्याय संपला.
नवव्या अध्यायाच्या शेवटी शेवटी आपण पाहिले की भगवान श्री व्यासांनी दिलेल्या दिव्यदृष्टीनुसार आणि दिव्य श्रवणक्षमतेनुसार संजयाने जे जे पाहिले व जे जे ऐकले, ते ते सगळे तो धृतराष्ट्राला सांगत होताच. पण त्याचे जे नेमके गमक आहे, तेही तो धृतराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न करीत होता. पण त्याकडे धृतराष्ट्राचे लक्षच नव्हते. त्याच्याकडे बघून संजयाला असे स्पष्ट जाणवत होते की धृतराष्ट्र कृष्णाच्या कथनाच्या त्या गाभ्यापासून खूपच लांब गेलाय! या गोष्टीचा संजयाला खेद झाला. तेव्हा तो स्वतःशी विचार करायला लागला की काय म्हणावे आणि काय करावे? याचा स्वभावच असा! त्याला काही उपाय नाही. पण माझे दैव किती थोर म्हणायचे? या धृतराष्ट्राला युद्धवृत्तांत सांगायला मिळावा या निमित्ताने मुनिराज श्री व्यासदेवांनी प्रत्यक्ष आज मला जन्म-मृत्यूच्या भयातून सोडवले. अशी दृढ जाणीव संजयाला झाल्याबरोबर त्याचे सात्विक भाव प्रकट झाले. ते आवरण्याचे प्रयन करूनही आवरेनात.
अष्टसात्विकभावांना सात्विक भाव म्हणतात. म्हणजे सत्वगुणाचे आठ भाव. भक्तिप्रेमाने अंत:करण भरून गेल्यामुळे दृश्य होणारे परिणाम -
१. स्तंभ - स्तब्धता, २. स्वेद - घामफुटणे, ३. रोमांच - शरीरावरील केस उभारले जाणे, ४. स्वरभंग - आवाज बदलणे, ५. कंप - शरीर कांपणे,
६. वैवर्ण्य - चेहेऱ्याचा रंग बदलणे (आरक्त किंवा फिकट होणे). ७. अश्रुपात - डोळ्यांतून आनंदाश्रू येणे, ८. प्रलय - निश्चेष्टता, भावसमाधी.
त्याचे मन आश्चर्यचकित झाले. चित्त आटायला लागल्यासारखे झाले. आणि त्याचबरोबर वाचाही पांगुळली! सगळे अंग नखशिखांत रोमांचित झाले. अर्धवट उघडलेल्या व अर्धवट मिटलेल्या लोचनांमधून आनंदाश्रू वहायला लागले. अंतरांत अवर्णनीय सुख उचंबळायला लागले व त्याच्या योगाने शरीराला कंप सुटला. रोम-रंध्रांमधून स्वेद-बिंदू प्रकटले आणि त्यांच्यामुळे जणू काही मोत्यांचे जाळेच तो ल्यायल्यासारखा दिसायला लागला. अशा प्रकारे अंत:प्रांतातून तो महा-सुखाने भरून गेला असताना अर्थातच त्याची जीव-दशा आटायला लागली आणि तशात महर्षी व्यासदेवांनी केलेल्या आज्ञेचा त्याला सर्वथा विसर पडायला लागला.
तेवढ्यात चक्रपाणी श्रीकृष्णाने भक्तोत्तम अर्जुनाला या गीतोपदेशाचा पुढील भाग सांगायला सुरवात केल्याने ते अनमोल बोल घोंघावत त्याच्या कानी आले आणि त्याचे हरपत चाललेले देहभान त्या शब्दघोषाने परत जाग्यावर यायला लागले. त्याने डोळ्यांमधली आसवे पुसली, सर्वांगाचा घाम टिपून घेतला आणि उल्हासून तो धृतराष्ट्राला कृष्णार्जुनांचा पुढील संवाद निवेदन करू लागला.
आधीच संजयाची मनोभूमी सात्विक आणि सुपीक. त्यात कृष्ण-वाक्याचे निवडक बीज. त्याच्या परिणामस्वरूप आता प्रमेय-पिकाचा सुकाळ होईल आणि तो सगळ्या श्रोतेजनांस लुटायला मिळेल. म्हणून सकल सज्जन श्रोतेजनहो, इकडे अळुमाळ (थोडेसे) अवधान (लक्ष्य) द्या जेणे करून तुम्ही स्वानंदाचे धनी व्हाल. प्रत्यक्ष भाग्य आपल्या कानांजवळ आलेले असल्यामुळे आज तो 'सिद्धांचा राव' आपल्या भक्तोत्तम अर्जुनाला 'विभूतींचा ठाव' दाखवील. ऐकाच ती कथा आता भावपूर्णतेने!
दहाव्या अध्यायाच्या विस्तृत विवेचनाच्या नमनाला संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांनी 'गुरुकृपेचा अगाध महिमा' आणि 'गीतामृतामाजी नवव्या अध्यायाची थोरवी' या दोहोंच्या रसभरित वर्णनावर बरेच तेल घातलेय. पुनरुल्लेखाचा दोष स्वीकारूनही ते वर्णन न चुकता ऐकावे, वाचावे असेच आहे. म्हणून ते न टाळता इथे खाली देत आहे. त्याचबरोबर ज्ञानदेवांनी नवव्या अध्यायाबरोबर संपणाऱ्या गीतामृताच्या पूर्वार्धाचाही लेखाजोखा संक्षेपात दिला आहे, तोही आवर्जून वाचण्यासारखा आहे.
शुद्ध ज्ञानाचे दान करण्यात चतुर असलेल्या हे गुरुराया, तुला नमस्कार करतो. हे गुरुराया, विद्यारूपी कमळ तूच फुलवतोस. स्वस्वरूप-स्थिती हा जो 'परे'चा विषय आहे, तिथे तू सदैव क्रीडा-रत असतोस. (वाचेच्या चार अवस्था सांगितलेल्या आहेत. परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. 'परा' वाणी ही नाभिस्थानी राहिलेली निर्विकल्प आठवरूप अशी पहिली वाचा. दुसरी 'पश्यन्ती' ही परेपासून हृदयस्थानी ईषन्मात्र म्हणजे किंचित् उमटणारी भासरूप वाणी. तिसरी 'मध्यमा' ही कंठस्थानी राहणारी मननात्मक वाणी आणि चौथी 'वैखरी' ही जिच्या योगानं शब्दोच्चार होतो ती स्पष्ट उमटणारी वाणी.) जीवन-स्वरूप अंधार पिटाळणारा भास्कर तूच आहेस. तुझे बळ अनंत अपार आहे. त्याला पारावार नाही. तारुण्य-संपन्न अशा 'तुरीय-अवस्थे'चे लालन तू करतोस. सकळ विश्वाचे पालन तू करतोस. मांगल्य-रत्नांची तूच एकमेव ठेव आहेस आणि एकमात्र पूजनीय देव ही तूच आहेस. साधु-संत-जनांचे जे कुठले एक वन आहे त्यातले तूच एकमेव चंदन आहेस. तू स्वानुभूतीचा राजराजेश्वर आहेस. सुज्ञजनचित्त-रुपी जो चकोर असतो, त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने चंद्रमा तू आहेस. तू वेदरहस्याचा सागर आणि मदनाचा मदन आहेस. शुद्ध-भावे करून भजावयाचे स्थान तूच एक आहेस. प्रपंचस्वरूपी मदमत्त हत्तीचे गंडस्थळ खऱ्या अर्थाने भेदणारा तूच आहेस. तूच एकमात्र विश्वाच्या उत्पत्तीचे स्थळ आहेस. तुझ्या कृपा-रूपी गणेशाचे बळ लाभले तर अज्ञ बाळाचाही सकळ विद्यांमध्ये प्रवेश होतो, यात तिळमात्र शंका नाही.
(क्रमशः)

- मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल
असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३