
वाळपई : सोमवारी मध्यदुपारी झालेल्या एका दुर्दैवी घटनेत, भुईपाल येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाजवळ असलेल्या भारत गणेश वेर्णेकर यांच्या घराला अचानक आग लागून प्रचंड नुकसान झाले. या आगीत त्यांची स्कूटर आणि घरातील टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनसारखे किमती सामान जळून खाक झाले असून, या कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास भारत वेर्णेकर यांच्या घराला ही आग लागली. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, या घटनेत कुटुंबाला जवळपास ३ लाखांचे नुकसान झाले आहे.श्रीकृष्ण नाईक यांच्या नेतृत्वाखाली तुळशीदास झर्मेकर, रामा नाईक, रूपेश गावकर, चारुदत्त फळ, आनंद शेटकर, फटी कलमिश्वर यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार असून, त्यानंतर भरपाई देण्यासंदर्भाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कुटुंबाने आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. अखेर वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. घराशेजारी पार्क केलेली जीए-०४-एन-७४९३ ही स्कूटर, वॉशिंग मशीन, टीव्ही आणि फ्रीजसह घरातील महत्त्वाचे सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाने चोख कामगिरी करत कुटुंबाची सुमारे ५ लाखांपेक्षा जास्त मालमत्ता वाचविण्यात यश मिळवले.