तेरेखोल नदीमध्ये बेसुमार रेती उत्खनन थांबवण्यात सरकारला अपयश

पेडणे : जैतीर-उगवे रेती व्यवसाय प्रकरणी गोळीबार केलेले पाच संशयित नेहल  नितीन महाले, आशिष शिवाजी महाले, आकाश अरुण महाले, ऋषिकेश दशरथ महाले, गंगाराम गोपीचंद महाले या पाचही जणांना पाच दिवस पोलीस कोठडीत देण्यात आली.             
जैतीर-उगवे तेरेखोल नदीत रेती व्यवसायातून झालेल्या गोळीबार प्रकरणी उगवे भागातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. पोलीस चौकशीत त्यांनी गोळीबार केल्याचा गुन्हा कबूल केला असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. गोळीबार करण्यासाठी वापरलेली गन आणि एक वाहन अजून पोलिसांच्या ताब्यात मिळालेले नाही. तेही लवकरच पोलीस हस्तगत करतील, असे पेडण पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी सांगितले.             
उगवे तेरेखोल नदीमध्ये बेसुमार रेती उत्खनन चालू होते. या संदर्भात मागील बारा वर्षांपासून उगवे ग्राम संघर्ष समितीने सरकारला वेगवेगळ्या पद्धतीने लेखी स्वरूपाचे निवेदन, तक्रारी दिल्या तसेच मोर्चे काढण्यात आले. परंतु, त्या परिसरात रेती उत्खनन थांबवण्यात सरकारला यश आले नाही. या रेती उत्खननामुळे उगवे परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेती-बागायती तेरेखोल नदीच्या पात्रात जलसमाधी घेताना शेतकऱ्यांनी पाहिले. त्याचाच राग काढण्यासाठी जे कोणी बेकायदेशी रेती उत्खनन करतात, त्यांना भीती दाखवावी या उद्देशाने सदर गोळीबार करण्यात आला.            
सध्या तेरेखोल नदीत बेकायदा उत्खनन पूर्णपणे बंद झाले असून, नदीपात्रातील होड्या किनाऱ्यावर आणण्यात आल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रातून मोठ्या ट्रकमधून येणाऱ्या रेतीवर मात्र कोणाचाही अंकुश नाही, अशी माहिती आहे.