अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद : वाटमारीतून प्रकार घडल्याचा अंदाज

म्हापसा : पिर्ण-बार्देश येथील पठारावर मृत्तावस्थेत सापडलेल्या युवकाचा खून झाल्याचे उघड झाले असून कपील चौधरी (१९, रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार वाटमारीतून घडला असावा, असा संशय व्यक्त करून पोलिसांनी तपासकार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी ३१ रोजी सकाळी ८.३० वा. च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पिर्णहून थिवीकडे येणार्या मार्गावरील केळपिर्ण व खरगाळी कान्सा, थिवी सीमेवर पठारी भागात रस्त्याच्या कडेला युवक निपचित पडला होता. या रस्त्यावरून ये जा करणार्या लोकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले.
रुग्णवाहिकेतून त्याला म्हापसा जिल्हा इस्पितळात आणले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले व घटनेची माहिती कोलवाळ पोलिसांना दिली.
त्याच्या शरीरावर लाथाबुक्कीने झालेल्या मारहाणीच्या गंभीर जखमा होत्या. त्यामुळे याच कारणास्तव त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.
सदर युवक हा गुरुवारी रात्री कान्सा-थिवी येथे दारूच्या नशेत पिर्णच्या बाजूने जाताना अनेकांच्या नजरेस पडला होता. वाटेत अनेकांकडे त्याने लिफ्ट मागण्याचा प्रयत्नही केला होता. चालत जाताना अज्ञात वाहनस्वारांसोबत त्याची झटापट झाली असावी व लुटीच्या उद्देशाने त्याला मारझोड केली असावी, असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनास्थळी पोलिसांना एक ओळखपत्र सापडले होते. त्यावर दीपक ठाकूर असे नाव होते. त्यामुळे मयताचा चेहरा हा ईशान्य भारत आणि नेपाळ मधील लोकांप्रमाणे दिसत होता. त्यामुळे त्याच परीसरातील असावा, असा अंदाज बांधून पोलीस मयताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. चौकशीवेळी मयताचे नाव हे कपिल चौधरी असून तो उत्तर प्रदेशमधील असल्याचे उघड झाले.
वडिलांकडून तक्रार दाखल
पोलिसांनी त्यानंतर मयताचे नातेवाईक आणि पालकांचा शोध घेतला. रात्री उशीरा त्याच्या वडिलांनी पोलिसांत रितसर तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंद केला. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत पोलीस अधीक्षक राहूल गुप्ता व उपअधीक्षक विल्सन डिसोझा हे कोलवाळ पोलीस स्थानकात तळ ठोकून होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक निखील पालेकर हे वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.