मांद्रे गावचा भजनी सप्ताह

एका वर्षी पाऊस पडला नव्हता. गावाच्या देवस्थानाचे महाजन एकत्रित येऊन त्यांनी गाऱ्हाणे घातले व त्यानंतर अक्षरशः त्याच आठवड्यात पाऊस पडायला लागला. म्हणून तेव्हापासून आषाढी एकादशीला दीड दिवसांचा सप्ताह साजरा करण्यात आला.

Story: प्रासंगिक |
8 hours ago
मांद्रे गावचा भजनी सप्ताह

पूर्वीच्या काळी मांद्रे गाव निसर्गाने परिपूर्ण असा गाव होता. आता जशी जशी प्रगती वाढत गेली, तसे तसे व्यवसाय वाढत गेले. त्याचबरोबर निसर्गही नष्ट होत गेला, शिल्लक राहिले ते फक्त डोंगर. असा हा आताचा पेडणे महालचा मांद्रे गाव. पण अजूनही शेती करणारा असा हा गाव.

तर मांद्रे गावात दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने 'तरंग उत्सव' व दिवाळीच्या दिवसांत 'अखंड भजनी सप्ताह' साजरा केला जातो. दरवर्षी मांद्रे गावातला वार्षिक भजनी सप्ताह एक विशेष आकर्षण असतो. या सप्तकात मोठ्या प्रमाणात लोक ग्रामदेवता श्री सप्तेश्वर भगवती मंदिर, देऊळवाडा या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात. त्यात मग काहींची कुठली मागणी असेल, नाहीतर कुणी नवस केला असेल, तर तो फेडण्यासाठी येतात. एकूण भक्त दर्शन घेण्यासाठी येथे येतात. गावातील लोकांपासून ते बाहेरून आलेल्या पाहुण्यांपर्यंत सगळेच या सप्तकात सामील होऊन या सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतात. वार्षिक भजनी सप्ताह हा केवळ एक मनोरंजनाचे साधन नसून आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. श्री भगवतीचे हे मंदिर मांद्रे हायवेच्या ठीक मांद्रे हायस्कूलच्या जवळच स्थित आहे. मंदिराच्या आजूबाजूला लोकांची घरे, असे एकूण वातावरण.

हा वार्षिक साजरा केला जाणारा भजनी सप्ताह म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊया. मांद्रे हा गाव पूर्वीपासूनच कृषीप्रधान असा गाव. संपूर्ण गावचे रहिवासी शेतीवर अवलंबून असायचे. आधी होती ती गुरे-ढोरे व पोट भरण्यासाठी शेती. असे म्हटले जाते की, एका वर्षी पाऊस पडला नव्हता. गावाच्या देवस्थानाचे महाजन एकत्रित येऊन त्यांनी गाऱ्हाणे घातले व त्यानंतर अक्षरशः त्याच आठवड्यात पाऊस पडायला लागला. म्हणून तेव्हापासून आषाढी एकादशीला दीड दिवसांचा सप्ताह साजरा करण्यात आला. पण ग्रामस्थ मंडळी आषाढ महिन्यात शेतीच्या कामात रुजू असायचे, म्हणून तेव्हापासून आषाढी एकादशीचा दीड दिवसांचा सप्ताह कार्तिक महिन्यात कार्तिकी एकादशीच्या दिवसांमध्ये करून सात दिवस वाढवून २४ तास सलग न थांबता असा 'अखंड भजनी सप्ताह' साजरा केला जाऊ लागला.

पूर्वी मांद्रे गावाची एक जमीन या देवस्थानाने पंढरपूरच्या नावे केली होती, म्हणून दरवर्षी त्या जमिनीवरील वार्षिक उगवलेले थोडे पीक पंढरपूरच्या वारीला जाताना घेऊन जातात. त्या सात दिवसांच्या अखंड भजनी सप्ताहाच्या दिवसांमध्ये त्या उमेदीने खूपशी मुले पेटी वाजवायला शिकतात, भजन म्हणायला शिकतात. सप्ताहामधील शेवटच्या दिवशी मोठा कार्यक्रम ठेवतात व बाहेरून उत्कृष्ट गायकांना गायनासाठी बोलावले जाते व गावातीलच नव्हे, तर इतर गावातील लोकही आनंद व उत्सवात सामील होतात.

सप्ताहाच्या निमित्ताने अनेक दुकानांसाठी ४-५ दिवस अगोदरच मांडव घातला जातो व विठ्ठल रखुमाईचा रथ पण सजविला जातो. मंदिराच्या बाजूलाच अनेक फुलं विकणाऱ्यांची छोटीशी दुकाने असतात. त्यात केळी, अगरबत्तीचा पुडा, कापडाचा बंडल, एकूणच ओटी भरायला लागलेली सामग्री उपलब्ध असते. मुलांचे लक्ष मोहून घेणारी दुकाने असतात. त्यात मग अनेक प्रकार आढळतात: जम्पिंग टॉय, वेगवेगळी खेळणी. ट्रक, कार, बॅट-बॉल, गन वगैरे व मुलींकरिता स्वयंपाकाची खेळणी, बाहुली व तिचे घर अशा प्रकारची खेळणी मुलांना आवडतात. पालकांनी कुठल्या गोष्टीसाठी नकार दिला, तर नंतर तिथेच हट्ट करणे असे प्रकार आपल्याला अनुभवायला मिळतात. बाकी कुठली दुकाने असो वा नसो, खाजांची मात्र दुकाने असतातच. त्यात अनेक प्रकारच्या मिठाया, जिलेबी, लाडू, मुख्यतः चीरमुल्यांचे लाडू, हलवा इत्यादी असतात. तर बायकांचे काहीतरी वेगळेच चाललेले असते. त्या शंभर दुकाने पारखून त्या पहिल्याच दुकानावर पुन्हा येतात व भांड्यांकरिता मोलभाव करून त्या दुकानदाराने सांगितलेळे असते की "मॅडम मुझे नही परवडेगा" (मॅडम, मला परवडणार नाही), त्या दुकानावर जाऊन तेच सामान घेणाऱ्या अशा बायका पाहायला मिळतात. पुरुष मात्र तिथे जाऊन गप्पच उभे राहतात, नाहीतर कोणी एखादा मित्र भेटला तर त्याच्याशी गप्पा मारतात. वयात आलेल्या मुलामुलींचे वेगळेच असते, त्यांच्या मनात आले तर काही घेतात, नाही तर तसेच परत घरी येतात. मुले मात्र तिथे अनेक मनोरंजनाचे खेळ खेळताना दिसतात. आपण जर कधी अनुभव घेतला तर तुम्हाला समजेल की, ही दुकाने तीन रस्त्यापासून ती देवळाच्या मागेपर्यंत असतात.

तुळशी विवाहाच्या दिवशी भजनी सप्ताहाचा शेवटचा दिवस असतो. पण फेरी मात्र आणखीन ३-४ दिवस असते. त्यात मोजकी दुकाने म्हणजे फर्निचर व इतर मातीची भांडी वगैरे राहतात, किंवा एखादा गोबी मंचुरियन स्टॉल असतो. तर असा हा सप्ताहाचा क्रम. पण मी जेव्हा लहान होते, तेव्हा सप्तकाला जायला फार उत्सुकता असायची. हे घेऊ की ते घेऊ असे व्हायचे. आता मात्र यातला प्रकार काही शिल्लक राहिलेला नाही. आताच्या पिढीतली उत्सुकता काहीच अनुभवता येत नाही. मोबाईल दिला की झाले! त्यांना ते भरपूर आहे. हे सत्य कटू असले तरी खरे आहे आणि त्यावर आपण दुर्लक्ष करत चाललो आहोत.


संजिवनी सावंत
गणपत पार्सेकर महाविद्यालय
हरमल गोवा.