कधी रात्री चंद्रप्रकाशात शाळेचं आवार उजळतं तेव्हा मी माझ्या सावलीकडे बघते. मनात विचार येतात, “मी पत्रांच्या रुपात जगले, भावनांच्या रुपात अमर झाले.” माझं आयुष्य संपलं नाही, फक्त त्याचं स्वरूप बदललं आहे.

मी आहे, तुमच्यासारखीच एक साक्षीदार, कधी गावात होणाऱ्या गप्पांची, कधी प्रेमाच्या कबुलीजबाबांची, कधी विभक्त झालेल्या आई मुलाच्या आठवणीतील ओघळलेल्या अश्रूची. मी म्हणजे ती जुनी लाल टपालपेटी जी कधी वडाच्या झाडाखाली उभी तर कधी गावाच्या चौकात. तर कधी कुठच्या तरी कार्यालयाबाहेर उन्हाने तापलेली, पावसात भिजलेली, थंडीच्या धुक्यात हरवलेली, पण कधीही रिकामी नसणारी. आज मला व्यक्त व्हायचंय.
माझं आगमन गावात झालं तेव्हा सगळीकडे उत्सुकता होती. पोस्टमन गणप्या, जो नव्यानेच पोस्ट ऑफिसात लागला होता, तो मला काळजीपूर्वक घेऊन आला होता. त्यादिवशी गावकरी जमले होते. “अरे बघ, हीच ती पोस्टपेटी म्हणे!” गणप्यानं मला त्या वडाच्या झाडाखाली घट्ट बसवलं. लाल रंग चमकत होता. टपालपेटी असं लिहिलेलं होतं. त्या अक्षरांत किती अभिमान होता. पहिलं पत्र टाकलं ते शाळेच्या शिक्षकांनी. त्यांच्या मुलाला, जो पुण्यात शिकायला गेला होता. त्या पत्रात लिहिलं होतं, “चांगलं शिक, पण गावाला विसरू नको. आई रोज तुझी वाट बघते.” त्या पत्रानंतर एकामागोमाग पत्रांचा प्रवास झाला. प्रेमपत्रं, नोकरीसाठी अर्ज, हुकूमशाहीची तक्रार आणि एखादं चुकून टाकलेलं पाकिट, ज्यात फुलं असायची. प्रत्येक पत्र म्हणजे एक कथा होती आणि मी त्या सगळ्या कथांची साक्षीदार असायचे. गावातील लोकांचं मन माझ्याकडे व्यक्त व्हायचं त्यांनी लिहिलेल्या पत्रातून. त्याकाळात लोकांना लिहायला आवडायचं. शब्दांनी भावना व्यक्त करायची सवय होती. एखादी तरूणी घरातील बायकांची नजर चुकवून तिचं प्रेमपत्र द्यायची, तेव्हा माझं मन धडधडायचं. मी स्वतःला विचारायची, “हे पत्र पोहोचेल का? तिचं प्रेम खरं असेल का?” एक वृद्ध आजी रोज सकाळी यायची. मुंबईत कारखान्यात काम करणाऱ्या नातवाला लिहिलेलं पत्र टाकायला. त्याचं उत्तर यायचं तेव्हा आजी मला मायेने गोंजारायची. त्यावेळी आजी नातवाला भेटलीय असं वाटायचं. माझ्यामुळे ती व तिचा दूर असलेला नातू भेटू शकतात याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसायचा. बाळाच्या जन्माची बातमी सांगण्यासाठी कधी एखादं नवविवाहित जोडपं एकत्र येऊन पत्र टाकायचं. त्या पत्राच्या शाईत आनंदाच्या गोड क्षणांचा, मायेचा मखमली स्पर्श असायचा. माझ्याकडे एक गोड गुलाबी क्षण त्यांनी जपून ठेवलेला होता. अशा अनेक चांगल्या वाईट घटनांची साक्षीदार मी होते. पण हळूहळू सगळं बदललं. गावात टेलिफोन आला, मग मोबाईल. लोक म्हणू लागले, “आता पत्र कशाला लिहायचं? एक फोन केल्यावर बोलता येतं आणि लगेच बातमी सांगितल्यावर प्रतिक्रियाही मिळते. नको ते वाट बघणं.” त्यानंतर अनेकदा मी पत्र नसल्याने रिकामी राहिले. संध्याकाळपर्यंत वाट बघत थांबायचे, पण कुणीही पत्र टाकायला येत नसायचं. गणप्या आला, त्याने हातातल्या चावीने दार उघडलं आणि आत डोकावलं. एकही पत्र नसल्याने मी पूर्ण रिकामी होते. त्याच्या चेहऱ्यावर हलकी उदासी होती. त्याने मला थोपटलं, “काळ बदलतोय गं, पण तुझं मन मात्र जुनंच आहे.” त्यावेळी मला पहिल्यांदा एकटेपणा जाणवला. मी वाऱ्याशी बोलले, “कुणी नाही आता मला पत्र द्यायला का?” वारा गप्प राहिला. थोड्या वेळाने माझ्या अंगावरची धूळ उडवून गेला. असेच दिवसामागून दिवस गेले. वर्षं गेली. माझा लाल रंग उडाला. काही ठिकाणी गंज चढला. कधी एखादं मूल कुतूहलाने येऊन माझं झाकण उघडायचं, आत डोकवून विचारायचं “इथे पत्र असतातं का अजून?” त्यावेळी सोबत असणारी व्यक्ती उत्तर द्यायची, “नाही, आता नाही. पण एकेकाळी गावातल्या माणसांची मनं पत्ररुपात इथूनच जात असत.” मी ऐकत राहायची. त्या प्रश्नात आजची नवीन पिढी होती, पण माझ्या अंतःकरणात जुन्या आठवणींचा गोंगाट चालू असायचा. एक दिवस असा उजाडेल याची पुसटशी कल्पना होती आणि तो दिवस उजाडला. एका सकाळी दोन माणसं आली. पोस्ट ऑफिसचे अधिकारी होते. त्यांच्याजवळ एक नोटीस होती. त्यांनी गणप्याला सांगितलं, “बुक पोस्ट बंद झालंय, स्पीड पोस्ट आलंय. आता या जुन्या पोस्टपेट्या काढायच्या आहेत.” गणप्या काहीच बोलू शकला नाही. त्याने माझ्याकडे पाहिलं. “अगं, तू तर माझ्या लहानपणापासून आहेस. पण आता तुला नेणार आहेत.” त्यांनी मला उचललं. लोखंडी साखळीने मला घट्ट बांधलं आणि ट्रकमध्ये ठेवलं. गावकरी थांबून पाहत होते. कोणाच्या चेहऱ्यावर आठवण होती तर कोणाच्या चेहऱ्यावर उदासीनता होती. एवढ्यात कोणी म्हणालं, “अगं, आता ती जुनी पेटी कशाला? सगळं डिजिटल झालंय ना.” पण माझं मन ओरडत होतं. “डिजिटल झालंय हे खरं आहे, पण हृदय मात्र अजूनही भावना शोधतंय!” मला नगरपरिषदेच्या गोदामात टाकलं गेलं. आजूबाजूला तुटक्या सायकली, गंजलेले पंखे, जुने खांब. मी त्यांच्यामध्ये उभी होते. भावनिक गोष्टी, घटनांची साक्षीदार म्हणून. पण आता डिजिटलमुळे सगळ्यांना नको झालेली अडगळीत विसरलेली. कधी एखादं लहान मूल यायचं आणि माझ्याकडे बघून कुतूहलाने विचारायचं, “हीच का ती पोस्टपेटी ज्यात आजोबांचं पत्र टाकलं जात असे?” त्यावेळी मला थोडं बरं वाटायचं. अजूनही मी आठवते याचा आनंद वाटायचा. पण दिवसेंदिवस मी धुळीने माखत गेले. आता माझ्यावर लिहिलेली ‘टपालपेटी’ अक्षरंही अस्पष्ट झाली होती.
माझ्या आतल्या कोपऱ्यात अजून एक पत्र अडकलेलं होतं, शब्द पुसलेले होते, पण भावना अजून तशाच होत्या. ते कुणाचं शेवटचं पत्र होतं, शक्यतो “माफ कर” असं लिहिलेलं. माझं मन त्यावरच थांबलं होतं. जणू मी अजून ते पत्र पोहोचवायचं बाकी ठेवलं होतं. एका दुपारी एक वृद्ध माणूस गोदामात आला. त्याच्या हातात काठी, डोळ्यात धूसरपणा. त्याने मला ओळखलं. “अरे! हीच ना आपल्या गावातली पोस्टपेटी?” त्याने माझ्यावर हात फिरवला. “माझ्या मुलाचं पहिलं पत्र याच्यात टाकलं होतं मी. तो सैन्यात गेला होता. तुझ्यामुळेच माझं त्याच्याशी नातं टिकून राहिलं होतं गं.” त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. माझ्या गंजलेल्या अंगावर ते अश्रू पडले आणि मलाही गदगदून आलं. त्याने मागच्या अधिकाऱ्यांना सांगितलं,” ही स्क्रॅपला देऊ नका. गावात शाळेजवळ ठेवा. मुलांना दाखवा. हीच ती पोस्टपेटी जी कधी काळी पत्ररुपात भावना पोहचणारी दूत होती.” आता मी गावच्या शाळेच्या आवारात आहे. माझ्या खाली पाटी आहे. “ही पोस्टपेटी १९८३ ते २०२० या काळात कार्यरत होती. या पेटीतून हजारो पत्रांनी माणसांना एकत्र आणलं.” दररोज मुले येतात, मला बघतात काही जण जवळ येऊन हात लावून बघतात व एकमेकांशी गप्पा करत निघून जातात. कधी माझ्यात काल्पनिक पत्रं टाकतात. मी पुन्हा आनंदी होते. त्या काल्पनिक पत्रांनी माझं गंजलेलं शरीर पुन्हा टवटवीत होतं. मी आता जुनी झालेय, पण समाधानी आहे. काय पाहिलं नाही मी. सगळं मी पाहिलंय प्रेम, विरह, आनंद, दुःख, अपेक्षा, तक्रारी हे सगळं कागदावर उतरलेलं होतं आणि माझ्यामार्फत ते त्या व्यक्तीला पोचलं होतं. आजच्या बदललेल्या युगात लोक स्पीड पोस्ट वापरतात, व्हॉट्सअॅपवर seen आणि typing करतात, पण त्या जुन्या पत्रातली “मनापासून लिहिलेली ओळ” कुठेतरी हरवलीय. त्या हरवलेल्या ओळी शोधताना मी कधी कधी वाऱ्याला विचारते, “कोणी मला पुन्हा पत्र टाकेल का?” वारा हसून म्हणतो, “आता लोक डिजिटल झालेत, पण भावना अजून तुझ्याचसारख्या आहेत.” मला बरं वाटतं. कारण मी अजूनही लोकांच्या मनात आहे. त्या लाल रंगाच्या, गंजलेल्या, पण उबदार टपालपेटीच्या रूपात. कधी रात्री चंद्रप्रकाशात शाळेचं आवार उजळतं तेव्हा मी माझ्या सावलीकडे बघते. मनात विचार येतात, “मी पत्रांच्या रुपात जगले, भावनांच्या रुपात अमर झाले.” माझं आयुष्य संपलं नाही, फक्त त्याचं स्वरूप बदललं आहे. आज स्पीड पोस्टने पत्रं जातात, पण माझ्या दिवसांतली ती भावनांची गती अजून कोणाला अवगत झाली नाही. जरी टपालपेटी बंद झाली असली तरी काही व्यक्तींची मनापासून लिहिण्याची सवय संपलेली नाही.

- मंजिरी वाटवे