पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना फुकट न्यायचे फटोबा त्यातील सगळे आता मोठे झालेत. नुसते मोठे नाही बरं का! अगदी मानाने आणि पैश्यानेही. पण आपल्या लाडक्या कंडक्टर काकांना मात्र विसरत नाहीत.

पोटाची सोय लावण्यासाठी जरी कोकणी माणूस चाकरमानी झाला तरी त्याचे आपल्या मूळ गावावरचे प्रेम कधीच लपून राहत नाही. होळी,गणपती ह्या वेळेस तर ते अजून उफाळून येते. आमचे घरही त्याला अपवाद नव्हते. सासरे रेल्वेत नोकरीला असल्याने मुंबईत राहत असले तरी अर्धे लक्ष त्यांचे गावाकडे. काहीही कारण पुरत असे त्यांना गावी जायला. तीच आवड आमच्या ह्यांच्यात उतरली अगदी. जरा कुठे उसंत मिळू द्या ताबडतोब कुडाळ जिंदाबाद! अर्थात् मी ही कधी आडकाठी आणली नाही कारण माझाही थोडा स्वार्थ होता म्हणा हवे तर. अहो गावी आल्याच्या निमित्ताने गोव्यात माहेरी जाणे होई ना माझे,असो!
रेल्वे यायच्या आधी गावी जायला एकमेव साधन म्हणजे एसटी (लालपरी). त्याकाळीच नव्हे तर आजही कोकणात गाडी नेणे आणि फिरणे म्हणजे दिव्यच. अहो रस्ते भन्नाट ना! खुळखुळा बरा अशी अवस्था व्हायची गाडीची. अश्या वेळी गरज पडायची ती लालपरीची. आमचे गाव सावंतवाडी कुडाळच्या मध्ये. सकाळी कुडाळला जायला बाजारात आठची एसटी असायची नेमळ्याहून येणारी. गावी गेल्यावर रोज ताजे मासे आणायला कुडाळला जाणे नित्याचेच. आठ वाजता नाक्यावर गाडी आली की आतून पुकारा होई, “येवा येवा झारापकरानु, संबाळून चडात” अगदी दणदणीत आपुलकी. गाडीत चढतानाच कळायचे आज फटोबा आहेत कंडक्टर! आमचे हे खूश मग. एक तर सीट फिक्स आणि फटोबासोबत गप्पा मारता मारता रस्त्यावरच्या खड्ड्यांचाही विसर पडे!
तर असे आमचे हे फटोबा म्हणजेच फटु नाईक. वय पन्नास, बावन्नच्या आसपास, सतत प्रवासाने रापलेला चेहेरा, शोधक डोळे जसे कंडक्टरचे असावेत तसे आणि अस्सल कोकणी पहाडी आवाज. कुडाळ डेपोत कंडक्टर. अठ्ठावीस वर्षे सर्व्हिस झाली ह्या भागात त्यामुळे पूर्ण कोकणची ओळख साहजिकच मैत्री जमायला वेळ लागला नाही.
नेमळे जवळच त्यांचे घर त्यामुळे रात्री मुक्कामाच्या गाडीवर फटु नाईकांची ड्युटी फिक्स. सकाळी पहिली ट्रीप त्यांचीच. त्याकाळी एसटी सोडून दुसरे वाहन नाही. पार विद्यार्थ्यांपासून ते गावठी भाजी कुडाळमध्ये विकणाऱ्या म्हाताऱ्यापर्यंत सगळे सकाळच्या पहिल्या एसटीचे मेंबर. साहजिकच फटु नाईक फेमस अगदी. सगळे प्रवासी त्यांना फटोबा म्हणत. त्याकाळी अशी नावे कॉमन कोकणात. शाळेत जाणारे सगळे विद्यार्थी ओळखीचे. एक जरी दिसला नाही की लगेच विचारणा व्हायची आणि जरा उशीर होणार असेल बस सोडत नसत फटोबा. बाकी लोकांकडून आदल्या दिवसाचे चार आणे उरले तर ते सुध्दा वसूल करणारे फटोबा शाळकरी पोरांना मात्र खूप सवलत देत. आठवड्यातून एकदा सगळ्यांना साखरेचे गड्डे वाटत गाडीत आणि मिश्किल हसून म्हणत, अहो त्या निमित्ताने तरी पोरं शाळेत जातील!.
कंडक्टर म्हणून कडक असलेला हा माणूस मूळचा तसा खूप प्रेमळ. लहानपणी अठरा विश्व दारिद्र्य पाहिलेला सहा भावंडात मोठा. मग त्यात शिक्षण ते काय? इच्छा असूनही मॅट्रिक नंतर शिकता येईना शेवटी डी एड ला ऍडमिशन घेतली, पास झाले. पण नोकरी नाही. अशीच दोन वर्षे गेली. त्याच वेळेस कोकणचे खासदार दंडवते साहेबांच्या कृपेने कंडक्टर ट्रेनिंग क्लास सुरु झाले कणकवलीत. शेवटचा उपाय म्हणून फटु नाईक गेले ट्रेनिंगला. पास झाले आणि देवाच्या कृपेने नोकरी मिळाली तीही सरकारी. पदरी पडले पवित्र झाले ह्या न्यायाने शिक्षक व्हायची स्वप्ने पाहणारे फटु नाईक लालपरीचे वाहक झाले. कायम दंडवते साहेबांचा फोटो आपल्या पाकिटात ठेवत ते. नेहमीच म्हणायचे, “अहो झारापकरानु, कोकणाने देशाला खूप माणसे दिली. अगदी सी.डी.देशमुख ते सचिनपर्यंत. पण देशाने काय दिले हो आम्हाला तो एकच आमचा तारणहार मधू दंडवते! कोण कुठला घाटावरून आलेला माणूस पावला आम्हाला. पोटाला लावले त्याने आम्हाला” खरंच फार आदराने बोलायचे आणि काही अंशी ते खरं आहे म्हणा.
फटु नाईक प्रवाश्यात तसेच स्टाफमध्येही फेमस व्यक्ती. कुडाळ डेपोत आरोग्य फंड चालू केला त्यांनी. महिन्याला ठराविक पैसे वर्गणी काढून ते गरजू स्टाफला कमी व्याजाने देत. आणि आलेला फायदा एखाद्या आजारी कामगाराला उपचारासाठी वापरला जात असे. हिशेबात अगदी काटेकोर. फटोबा निवृत्त होईपर्यंत फंड नीट सांभाळत होते. आता पुढील पिढी री ओढतेय त्यांची. सल्ला द्यायला फाटोबा आहेतच.
एकदा वाडीहून एसटी घेऊन येताना रस्त्यात गर्दी दिसली. गाडी थांबली. तर समोर एक अडलेली बाई! बिचारीचे दिवस भरत आले होते. फटोबानी चटकन परिस्थिती ओळखली. गाडीत घेतली तिला. अर्थात् आधी सांगितल्याप्रमाणे रस्ते प्रेक्षणीय, त्यात हॉर्न सोडून सगळे पार्ट वाजणारी बस. पण फटोबा असल्यावर प्रॉब्लेम नव्हता. गाडी तीसच्या स्पीडवर गेली नाही. कुडाळमध्ये सरकारी इस्पितळासमोर उभी राहिली गाडी. फटोबानी डॉक्टरांच्या ताब्यात सोपवली बाईला आणि आपण परत तिकिटे फाडायला हजर बसमध्ये. नंतर कळले मुलगा झाला तिला. बाईचा नवरा आडदांड गडी अगदी तालेवार पण भर स्टँडवर पायावर पडला फटु नाईकांच्या. अख्खा स्टँड, बाजार साक्षीला होता.
फटु नाईकांना मूलबाळ नाही. पण एसटीने रोज प्रवास करणाऱ्या मुलांना ते आपलेच मानीत. ह्या मुलात बसलो की खरेच बाप झाल्यासारखे वाटते असे ते म्हणत. आम्ही गावी गेलो की खूपदा भेटतात. मोबाइलने संपर्कही वाढलाय. निवृत्त झाले आता. मिळालेल्या पैशातून काही शाळेला देणगी म्हणून दिलेत. कुडाळ डेपोत त्यांनी चालू केलेल्या फंडाच्या शाखा आता अनेक डेपोत विस्तारल्या आहेत. आजही अडीअडचणीला अनेकांना फटु नाईक आठवतात. पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना फुकट न्यायचे फटोबा त्यातील सगळे आता मोठे झालेत. नुसते मोठे नाही बरं का! अगदी मानाने आणि पैश्यानेही. पण आपल्या लाडक्या कंडक्टर काकांना मात्र विसरत नाहीत. तुम्हाला माहिती आहे? आजपर्यंत पेन्शनचे पैसे बँकेतून काढण्यासाठी कुडाळला जाताना फुकट पास असून सुध्दा फटु नाईकांना एसटीने जाता येत नाही. कारण बसस्टॉपवर फटोबा दिसले की कोणाची ना कोणाची गाडी उभी राहते कंडक्टर काकांसाठी. बास आणखी आणि काय पाहिजे हो ह्या वयात...

- रेशम जयंत झारापकर
मडगाव, गोवा.