आठवणींचा हिंदोळा

जीवनाच्या सायंकाळी ती जगत असते फक्त आणि फक्त स्वतःसाठी. एक स्त्री म्हणून जीवनातील प्रत्येक जबाबदाऱ्या पार पाडताना ध्येयांचे उंच झोके घेण्याचा मानस तिने स्वतःच्या हिमतीने पूर्ण केलेला असतो.

Story: लेखणी |
25th October, 05:42 pm
आठवणींचा  हिंदोळा

अाठवणींच्या हिंदोळ्यावर कधीकधी नकळत अचानक मन झुलू  लागते. कधी कधी एखादी व्यक्ती खूप दिवसानंतर आपल्या डोळ्यासमोर अचानक येते किंवा एखादा चांगला किंवा वाईट प्रसंग आपल्या जीवनांत घडून येतो. काळाच्या ओघात आपण त्या आठवणी विसरूनही गेलेलो असतो परंतु अचानक त्या आठवणी जाग्या होतात. आपल्याला अगदी नको असतानाही मनाची मिटलेली कवाडे धडाधड उघडू लागतात आणि त्या आठवणीच्या हिंदोळ्यावर कितीतरी क्षण, तास, दिवस मन रेंगाळत राहते. तळमळत  राहाते. अगदी नको असतानाही त्या दुःखद आठवणीच्या मनातील खोल जखमांवरील खपली हळूहळू बाजूला सारली जातात आणि त्या साऱ्या आठवणी परत ताज्यातवान्या होऊ लागतात. मानवी जीवनाचे आणि झोपाळ्यावरच्या हिंदोळ्याचे एक घट्ट नाते जन्मभरीचे. अगदी  जन्माला आल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतचे नाजूक हळवे, मायेच्या हळव्या बंधानी बांधलेले. कधी नकळत डोळ्याच्या कडा ओल्या करणारे तर कधी मनःपटलावर हलकेच आनंदाचे मोरपीस फिरवणारे. झुला किंवा झोपाळा तसा सगळ्यांनाच आवडतो. बालकांना या झोपाळ्याचे विशेष आकर्षण परंतु तरुणांनाही आपल्या प्रिय, विशेष व्यक्तीबरोबर आकांक्षाच्या स्वप्नाच्या नभात उंच उंच उडणारा असा हा झोका घ्यावा असे वाटतेच की.. आयुष्याच्या त्या सोनेरी चमचमत्या वळणावर मातेच्या गर्भातून या दुनियेत आल्यावर बाळाला दुसरी उबदार मायेची, ममतेची जागा म्हणजे 'पाळणा' मऊसूत कापडात घट्ट लपेटून मऊ, ऊबदार कापडात पाळण्यात झोका घेता घेता बाळ निश्चिंत होऊन झोपी जाते. त्या पाळण्यातील झोक्यात अंगाई गीते ऐकतच बाळ लहानाचे मोठे होतानाच झोपाळ्यातील मजा त्याला ऊमजू लागते. बागेतील एखादा झोपाळा नजरेस पडताच ते चटकन झोपाळ्यावर बसण्यासाठी धाव घेते अन् हळूहळू शाळेत जायला लागल्यावर तिथल्या बागेतील झोपाळ्यावर बसण्यासाठी कधीकधी वर्ग मित्रांबरोबर भांडणे होतात तर कधी रुसवे फुगवे तर कधी "सेटिंगही"... म्हणजेच तुझा झोपाळ्यावरचा झोका घेऊन झाल्यावर मला झोपाळ्यावर बसायला पाहिजे. हा त्या बदल्यात मी तुला चॉकलेट किंवा टिफिनांतला खाऊ देईन" इथपर्यंत सेटिंंगची मजल जाते. झोपाळा म्हटला की मला डोळ्यासमोर दिसतो तो राधा कृष्णाच्या रासलीलेतील तो सजवलेला, मनोहरी झोपाळा यासारखा मनोहारी झोपाळा दुसरा कोणता असूच शकत नाही. राधा-राणी, किशन कन्हैयाला या झुल्यावर झोके घेताना पाहिले की आपले मनही आनंदाच्या नभात उंच उंच हिंदोळा घेऊ लागते. गोमंतकीय देवी-देवतांना नवरात्रीच्या नऊ दिवसांत मखर नावाच्या झोपाळ्यावर बसून हळुवारपणे मखर हलवतात. फुलांनी, विद्युत रोषणाईने सजवलेल्या मखरांतील देवीला झोपाळ्यावर झुलताना पाहिले की नतमस्तक होऊन दोन्ही हात भक्तिभावाने जोडले जातात. स्त्री जीवनांतही या झोपाळ्यावरच्या हिंदोळ्याला वेगळेच महत्त्व आहे. या हिंदोळ्यांना एक वेगळाच भावनिक गंध आहे. कितीतरी अविस्मरणीय क्षण आहेत आयुष्यभर तिने मनांच्या हळव्या कोपऱ्यात जपून ठेवलेले. काही सुखद काही दुःखद तिच्या डोहाळे जेवणाचे जीवनातील अविस्मरणीय क्षण. सजविलेल्या झोपाळ्यावर बसून तिच्या कौतुकांत रंगलेले  जणू. तिच्या जीवनातील आनंदाचे हिंदोळेच ते. येणाऱ्या नवीन पाहुण्याला आईच्या पोटातच झोपाळ्यावर बसायचे सुख बहाल करणारे. तरुणपणात तर तिला झोपाळ्यावर झुलायला आवडायचे. नंतर मग मुले थोडी मोठी झाल्यावर मुलांच्या निमित्ताने तिने हळूच झोपाळ्यावर बसून झोक्याचे सुख अनुभवलेले असतेच. मुले थोडी मोठी झाल्यावर तिच्या घराच्या गॅलरीतील झोपाळा तिला आवडायला लागतो. कधी कधी धुंवाधार बरसणाऱ्या पावसात जीवनसाथी समवेत झोपाळ्यावर जरासे टेकून  विरंगुळ्याचा मनसोक्त आनंद लुटताना तिचे  मनही ताजेतवाने होऊन जाते. वाफाळलेल्या चहाचा अमृततुल्य आस्वाद आणि सोबतीला गरम गरम कांदा भजीची लज्जत  हा... हा... हा... पन्नाशीच्या जवळपास पोहचल्यावर बागेत फेरफटका मारताना तिलाही तिथला  झोपाळा  खुणावतो  पण ती लोक काय म्हणतील? या विचाराने स्वतःला झोपाळ्यावर बसवण्यापासून रोखते. मात्र साठीच्या जवळ पोहोचताच सहलीला गेल्यावर बिनधास्त ती हिंदोळ्यात रमते. झोपाळ्यावर बसल्यावर कदाचित  आपल्याला गरगरेल हे विसरून ती बिनधास्त झोक्यांचा आनंद लुटते फक्त आणि फक्त स्वतःसाठी. कारण जीवनाच्या सायंकाळी ती जगत असते फक्त आणि फक्त स्वतःसाठी. एक स्त्री म्हणून जीवनातील प्रत्येक जबाबदाऱ्या पार पाडताना ध्येयांचे उंच झोके घेण्याचा मानस तिने स्वतःच्या हिमतीने पूर्ण केलेला असतो. तिच्या मनःपटलावर अगणित अशा आठवणीची साठवण असतेच. काही क्षण संघर्षाचे, सुखाचे, आनंदाचे असतात तर काही क्षण दुःखाचे, विरहांचे... जीवनात काहीतरी गमवताना झालेल्या अनंत वेदना कुशीत घेऊन बराच काळ  लोटलेला असतो. या वेदनादायी क्षणांना तसेच मनांच्या कोनाड्यात ठेवून ती पुढे पुढे चालत असते. जीवनाच्या झोपाळ्यावर मग एकटीनेच झोका घेताना तिचा झोका मात्र उंच यशाच्या नभांगणात आनंदाच्या चमचमत्या तारकांना कवेत  घेऊन हिंदोळा घेत असतो. जीवनाच्या सायंकाळी ह्याच आठवणीच्या हिंदोळ्यावर मन झुलताना नकळत ती भूतकाळात रमून जाते. एकांतात तिला आठवणीचे हिंदोळे सोबत करीत असतात. नकळत तिच्या  मुखांतून शब्द  गुणगुणू लागतात...

आनंदाचं लेणं कुशीत घेऊन बाई ...

हिंदोळा  यशाचा उंच उंच जाई..

जगण्याच्या गोडवा घेऊन जीवनाच्या सायंकाळी...


- शर्मिला प्रभू 

 फातोर्डा मडगाव