सूर तेच छेडिता...

प्रत्येक माणूस आज काही ना काही ताणाखाली असतो. आणि अशा वेळी संगीत म्हणजे आत्म्याला दिलासा देणारी एक हळुवार थाप ठरते.

Story: मनी मानसी |
9 hours ago
सूर तेच छेडिता...

कधी अनाहूतपणे सकाळच्या धुंद वातावरणात रेडिओवर लागलेलं ‘तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा...’ ऐकू आलं तर नकळत आपण आपल्या भूतकाळाच्या एखाद्या कोपऱ्यात अलगद पोहोचतो, नाही का? समोर कॉफीचा वाफाळता कप असतो, पण मन मात्र कॉलेजच्या त्या पहिल्या पावसात कुणीतरी दिलेल्या छत्रीत हरवलेलं असतं. पण असं का बरं होत असेल? 

अहो, संगीताचं हे सामर्थ्य विलक्षण आहे. आपल्या मेंदूत, प्रत्येक आठवणीला एक भावनिक सूर असतो. म्हणूनच काही गाणी ऐकली की डोळ्यात पाणी येतं किंवा हसू फुटतं. नुसत्या स्वरांच्या माध्यमातूनही काळ थांबतो, आठवणी जाग्या होतात आणि मन पुन्हा त्या भावनेच्या हिंदोळ्यावर झोके घेवू लागतं. परंतू हा केवळ आनंद नव्हे, तर ही एक उपचाराची प्रक्रिया देखील आहे.

संगीत-रागांचे मानसोपचारात्मक चमत्कार

मानवी मनाला शब्दांच्या पलीकडे नेणारी एकमेव भाषा म्हणजे संगीत आणि आपल्या प्राचीन संगीतशास्त्रानं तर या सगळ्याचा शोध हजारो वर्षांपूर्वीच घेतला आहे! म्हणजे प्राचीन काळात असंख्य ऋषी, वैद्य आणि योगी, शास्त्रीय संगीतातल्या रागांचा उपयोग केवळ आनंदासाठी नव्हे, तर मन:शांती आणि आरोग्य साधण्यासाठी करत ज्यास आजच्या काळात ‘म्युझिक थेरपी’ असं देखील संबोधलं जातं. 

ही म्युझिक थेरपी म्हणजे फक्त कानाला गोड संगीत नाही, तर सुरांच्या माध्यमातून भावनिक, मानसिक आणि शारीरिक संतुलन साधण्याचा एक वैज्ञानिक प्रयत्न होय. संगीताच्या प्रत्येक रागाची एक स्वतःची ऊर्जा असते जी आपलं शरीर, मन आणि आत्मा संतुलित ठेवते. खरंतर, अगदी सोप्या शब्दांत सांगायचं, तर हे राग म्हणजे आपल्या मनाचे ‘ट्यूनिंग फोर्क्स’ आहेत. आपल्या मेंदूचं रसायनशास्त्रच बदलून टाकतात ते! डोपामीन, सेरोटाॅनिन यांसारखे ‘हॅप्पी हॉर्मोन्स’ सक्रिय होतात, हृदयाची गती संतुलित होते आणि मनातली गोंधळलेली भावनांची गर्दी शांत होते. म्हणूनच म्हटलं जातं, ‘Where words fail, music speaks.’

चला तर, पाहू काही रागांचे मनोवैज्ञानिक परिणाम : 

राग दरबारी कानडा : हा राग जरा खोल, गंभीर आणि आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करणारा होय. त्यामुळे संध्याकाळचा हा गहिरा राग असंख्य विचारांच्या जंजाळातून वाट काढत, चिंतेतून आपलं मन बाहेर काढतो. प्रचंड चिंताविकार अर्थात anxiety असलेल्यांना अतिशय उपयुक्त. 

राग यमन : हा राग म्हणजे प्रकाशाचा स्पर्श. ह्याच्या सुरांमुळे आपल्या मेंदूत प्रामुख्याने डोपामीनचा स्राव वाढतो, ज्यामुळे मूड सुधारतो. आणि त्यामुळे डिप्रेशन किंवा emotional fatigue असलेल्या व्यक्तींसाठी हे अत्यंत उपयोगी होय.

राग भैरव : सकाळचा हा राग आत्मचिंतन वाढवतो. ध्यानासाठी उपयुक्त. ओ.सी.डी, अनिद्रा किंवा ओव्हरथिंकिंगचा त्रास असलेल्या व्यक्तींना मानसिक स्थैर्य प्राप्त करण्यास मदत करतो.

राग खेळारी : हा कर्नाटक संगीत परंपरेतील एक रम्य राग. उदासीनता, ऊर्जा कमी असलेल्यांना पुन्हा प्रेरणा मिळवण्यासाठी हा एक अत्यंत उपयुक्त असा राग आहे. 

राग शंकराभरणम् : एकाग्रता वाढवणारा, विद्यार्थ्यांसाठी उत्तम.

राग खमाज : प्रेम, स्नेह आणि आठवणींशी जोडलेला राग. नातेसंबंधातली उब परत आणण्यासाठी आणि आत्मस्वीकार वाढवण्यासाठी उपयुक्त.

वरील दिलेल्या प्रत्येक रागाची विशिष्ट frequency आणि तालाची गती अर्थात tempo, मेंदूतल्या हार्मोनल संतुलनावर परिणाम करते. त्यामुळे संगीत हे केवळ कला नसून नैसर्गिक मानसोपचार आहे.

मग, आपणही संगीताचा उपचार घेऊ शकतो?

होय, नक्कीच! आज मानसोपचाराच्या क्षेत्रात ‘म्युझिक थेरपी’ने चिंता विकार, ए.डी.एच.डी, पी.टी.एस.डी आणि ऑटीझम असणाऱ्या रुग्णांमध्ये emotional regulation वाढल्याचं अनेक संशोधनांनी सिद्ध केलं आहे.

म्हणजे गाण्यानेच सगळं ठीक होतं असं नाही, पण सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तर, प्रत्येक माणूस आज काही ना काही ताणाखाली असतो. आणि अशा वेळी संगीत म्हणजे आत्म्याला दिलासा देणारी एक हळुवार थाप ठरते.

लक्षात घ्या, आपण प्रत्येकजण काही फार मोठे म्युझिक थेरपिस्ट नसू, पण संगीताशी आपलं नातं अधिक सजगपणे जोडलं, तर मनाच्या आरशावरचं धूसरपण नक्कीच कमी होतं. 

कारण, जेव्हा शब्द अपुरे पडतात, तेव्हा सूर बोलतात... आणि हलकेच मन बरं होऊ लागतं. 


मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा
७८२१९३४८९४