अखेर न राहून अमित उठला व सुरमावर ओरडला, “थांबव ते फुंकणे! मला तुझे वागणे अजिबात आवडलेले नाही!!” त्याबरोबर सुरमा एकदम रागात पलटला. त्याचे डोळे बंद होते. त्याने पटकन अमितवर उडी मारली. आता अमित खाली व सुरमा त्याच्या छातीवर बसला होता. तो अमितच्या थोबाडात मारीत होता आणि गुर्रर्रऽऽ गुर्रर्रऽऽ असा भयानक आवाज करत होता.

गोव्यातील अनेक तरुण खलाशी म्हणून विदेशातील जहाजांवर कार्यरत असतात. गेली तीन वर्षे 'कार्निवल' बोटीवर पेस्ट्री शेफ म्हणून काम करणाऱ्या अमित परब यांनाही घराची खूप आठवण यायची. त्यांच्यासोबत स्वयंपाकी म्हणून काम करणारे सुरमा नेगी हे मूळचे नेपाळी त्यांचे चांगले मित्र होते. आता दोघांचेही कंत्राट संपले. सुरमाच्या घरी भाऊ व भावजयी होत्या, तर अमितचे गोव्यात मोठे कुटुंब होते. अमितने सुरमाला आपल्या घरी गोव्यात बोलावले आणि दोघांचेही जल्लोषात स्वागत झाले. अमितने आपल्या गाडीने व मित्रांना बरोबर घेऊन सुरमाला गोवा फिरवला. एरवी एकाकी असणारा सुरमा अमितच्या कुटुंबात चांगलाच मिसळून गेला.
पावसाचे दिवस होते. अमितचे मित्र आणि सुरमा यांनी वास्को येथील 'थ्री किंग्स चर्च' व 'ठेंगे' नावाच्या नयनरम्य धबधब्यावर जायचे ठरवले. सोबत गरमागरम चिकन बिर्याणी घेऊन ते धबधब्यावर गेले. सुरमाने असा धबधबा कधीच पाहिला नव्हता. तो खूप खूश होता. सगळ्यांनी मनसोक्त आंघोळ केली, जेवले, नाचले.
संध्याकाळ झाली तरी सुरमा बाहेर यायला तयार होईना. "तुम्ही जा, मी इथेच राहतो," असे तो बडबडत होता. त्याच्या हातात सिगारेट होती व तो धुराचे झुरके घेत होता. खरं तर, अमितला पक्के माहीत होते की सुरमा सिगारेट ओढत नव्हता. रात्रीचे सात वाजत आले तरी तो ऐकेना, शेवटी अमित आणि मित्रांनी त्याला बंत्रेडीच्या डिकीत कोंबून घरी आणले. घरी पोहोचेपर्यंत सुरमा झोपला होता.
रात्रीचे साडेबारा वाजले असतील. खोलीत धुराचा मोठा झुरका उडत होता व सिगारेटचा वास पण येत होता. अमित जागा झाला. पाहतो तर सुरमा पाठमोरा, हातात सिगारेट घेऊन झुरके देत होता. अमितने सुरमाचे हे रूप कधीच पाहिले नव्हते. खरं तर अमित सुरमाला आपल्या धाकट्या भावाप्रमाणे समजत होता. सुरमाची घरची परिस्थिती नेपाळमध्ये खूप हलाखीची होती. आपले म्हणावे असे आई-वडीलही वारले होते. भाऊ चांगले होते पण भावजयी दुष्ट होत्या. पैसे असेपर्यंत त्याच्याशी चांगल्या वागायच्या आणि पैसे संपले की त्याच्याशी त्या फटकून वागत असत म्हणूनच सुरमाने बोटीवरचे काम निवडले होते. तिथे अमित हे तीस वर्षीय शेफ त्याला आपल्या भावाप्रमाणे वागवत असत. सुरमाचे हे असे विचित्र वागणे अमितसाठी खूप क्लेशदायक होते.
अखेर न राहून अमित उठला व सुरमावर ओरडला, “थांबव ते फुंकणे! मला तुझे वागणे अजिबात आवडलेले नाही!!” त्याबरोबर सुरमा एकदम रागात पलटला. त्याचे डोळे बंद होते. त्याने पटकन अमितवर उडी मारली. आता अमित खाली व सुरमा त्याच्या छातीवर बसला होता. तो अमितच्या थोबाडात मारीत होता आणि गुर्रर्रऽऽ गुर्रर्रऽऽ असा भयानक आवाज करत होता. आपला सच्चा मित्र आपल्याला असा वैऱ्याप्रमाणे का वागतोय, हे सगळे नक्की काय घडतेय हे अमितला काहीच समजत नव्हते.
तेवढ्यात सुरमाने डोळे उघडले. त्याच्या डोळ्याची बुब्बुळं पूर्ण सफेद व मधला भाग गुलाबी दिसत होता. तो डोळ्यांची उघडझाप करीत आपली बुब्बुळं गोलगोल गरागरा फिरवीत होता. अमित, “सुरमा... थांब, थांब!” म्हणत होता. अमितने सुरमाचे हे रूप कधीच पाहिले नव्हते. सुरमा मोठ्या आवाजात आता बोलू लागला... “मला सुरमा खूप आवडला.” तो वेगळ्याच भाषेत बोलत होता. तो म्हणाला, “माझे नाव निहार...” हे शब्द सुरमाच्या तोंडून येत होते पण त्यावेळी कोण वेगळाच बोलल्यासारखा दिसत होता. “मी निहार. मी श्रीलंकेचा. माझ्या बायकोसोबत गोव्यात मजेसाठी आलेलो. त्या दिवशी खूप मजा केली व येतेवेळी मी एकदम अखेरची उडी ठेंगे धबधब्यावर मारली. ही माझी एकदम अखेरची उडी होती. मी बुडालो आणि खूप प्रयत्न करूनसुद्धा बाहेर येऊ शकलो नाही. तिथेच संपले सगळे. बिचाऱ्या माझ्या बायकोने मला खूप शोधले. पण मी तिला सापडलो नाही. माझा आत्मा गेल्या अकरा वर्षांपासून कुणाचे चांगले शरीर व ती वेळ शोधीत होता. सुरमाच्या रूपात मला ते शरीर मिळाले,” असे सांगून तो भयानक आवाजात हसू लागला.
अमितने त्याला घट्ट पकडले व चादरीच्या मदतीने त्याचे हातपाय कॉटला बांधले. अमितने ही हकीकत घरच्यांना सांगितली. गावातील बुवांना बोलावून सुरमाच्या अंगावरची वाईट शक्ती काढण्यात आली. सुरमा पूर्णपणे ठणठणीत झाल्यावर अमित स्वतः नेपाळला जाऊन त्याला घरी सोडून आला.

श्रुती नाईक परब