भारतीय संस्कृतीतील हा एक असा सोहळा आहे, जिथे शाळीग्राम आणि तुळशीचा विवाह होतो. ही फक्त परंपरा नाही, तर निष्ठा, आरोग्य आणि पर्यावरण जतन करण्याचा एक सुंदर संदेश आहे.

जालंदराला मिळालेल्या वरदानामुळे विष्णूंनी त्याचा अंत केला, पतिव्रता वृंदेने विष्णू देवाचा पराभव केला, शाळीग्राम आणि तुळशीचा नंतर विवाह झाला..
त्यामुळेच, आज प्रत्येक घरात कार्तिक शुद्ध एकादशीला होतो तुळशी विवाहाचा सोहळा..
'तुळशी विवाह' हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा असा सण आहे. कार्तिक शुद्ध एकादशीला हा सण साजरा केला जातो. तुळशी विवाहाच्या अगोदर सर्व लोक आपापल्या वृंदावनातील तुळस स्वच्छ करतात, रंगवतात आणि तुळशी विवाहासाठी तयार राहतात.
आपण तुळशी विवाह करतो, पण त्यामागील कथा आपल्याला क्वचितच माहीत असते. पुराणकथेनुसार, वृंदा नावाची एक पतिव्रता स्त्री होती. तिचा पती असुरराज जालंधर होता, जो भगवान शिवांच्या वरदानाने अजय झाला होता. वृंदेच्या पतिव्रत्याच्या शक्तीमुळे देवतांना त्याचा पराभव करता येत नव्हता. भगवान विष्णूंनी तिची परीक्षा घेतली आणि जालंध्राचा अंत केला. परंतु, वृंदेला जेव्हा सत्य कळले, तेव्हा तिने भगवान विष्णूंना शाप दिला की ते दगड बनतील, आणि म्हणूनच विष्णू ‘शाळीग्राम’ रूपात पूजले जातात. वृंदेने नंतर स्वतःला अग्नीत झोकून दिले, आणि तिच्यापासून तुळशीचे झाड उत्पन्न झाले. त्यामुळे तुळशीला ‘वृंदा देवी’ चे रूप मानले जाते आणि भगवान विष्णू म्हणजेच शाळीग्राम तिचे पती मानले जातात. या दोन स्वरूपांचा विवाह हा 'तुळशी विवाह' म्हणून साजरा केला जातो. या विवाहाने देव-देवतांच्या उत्सवांचा आरंभ होतो आणि लग्नाचे मुहूर्त सुरू होतात.
अशाप्रकारे, पुराणकथेनुसार तुळशी विवाह साजरा करण्याची प्रथा हिंदू धर्मामध्ये सुरू झाली. जेव्हा तुळशी विवाहाचा दिवस येतो, तेव्हा सर्वजण आंघोळ करून, तुळशीच्या लग्नाची तयारी करून, स्त्रिया आपली कामे आटोपून, तुळशी विवाहासाठी सज्ज राहतात. लहान मुले तुळशीची सजावट करतात, रांगोळी घालतात, स्त्रिया बाशिंगे, हार तयार करतात, आणि मुले तुळशीला सजवतात. सर्वांच्या अंगणामध्ये सजावट, रोषणाई आणि उत्साहाचे वातावरण असते.
तुळशी विवाह साजरा करण्यासाठी सर्वांकडे भटजी बुवा येतात. घरातील पुरुष किंवा मुलगे तुळशीबरोबर विवाह करण्यासाठी तयारीत असतात. अर्थात, शाळीग्राम बनून ते तुळशीबरोबर विवाह करतात. तुळशीला हार घालून, बाशिंग बांधून सर्व पूजाअर्चा झाली की शेवटी मंगलाष्टके म्हटली जातात. तेव्हा सर्वजण 'शुभमंगल सावधान' असे म्हणतात आणि अक्षता वाहतात. शेवटी तुळशीला नैवेद्य दाखविला जातो. सर्व मुलांना गोड लाडू, चुरमुरे वाटले जातात. अशा पद्धतीने तुळशी विवाह अगदी जल्लोषाने साजरा केला जातो.
तुळशी विवाहाच्या विधीमध्ये स्त्रियांची मोठी जबाबदारी असते, कारण या दिवशी प्रत्येक स्त्री पुराणकाळातील 'वृंदा देवी’ प्रमाणे कणखरपणे कार्य करते. ज्याप्रमाणे घराच्या अंगणातील तुळस आपल्याला प्राणवायू देते, आपल्या आयुष्यातील वाईट गुणांचा ऱ्हास करते, त्याचप्रमाणे घरात स्त्रीशिवाय जीवनाचा अर्थ शून्य आहे. कारण स्त्री वादळे, वारे झेलते पण स्वतःच्या माणसांना दुःख पोहोचू देत नाही. अशा या स्त्रीशक्तीला तुळशी विवाहाच्या दिवशी मोठा मान असतो.
जेव्हा तुळशी विवाह संपन्न होतो, तेव्हा सर्वात शेवटी घरातील सुवासिनी 'जोडवी' जाळतात. म्हणजेच, केळीच्या झाडाचे सोप (खोड) घेऊन त्यावर कापसाच्या वाती ठेवल्या जातात आणि तेलात त्या वाती भिजवून नंतर भटजी त्याला अग्नी लावून देतात. शेवटी ते जळून संपेपर्यंत स्त्रिया तुळशीसमोर बसून राहतात. 'जोडवी जाळणे' यातून तुळशी विवाहाचा शुभ अंत आणि देवकार्याचा समारोप असा अर्थ अभिप्रेत होतो. त्याचप्रकारे आयुष्यातील नकारात्मकता 'जोडवी' जाळून दूर होते. मुख्य म्हणजे, जसे विवाहात होम, आरती होते, तसे जोडवी जाळल्याने अग्नीतून संस्कारांचे रूप व्यक्त होते.
तुळशीला केवळ धार्मिक महत्त्व नाही, पण आयुर्वेदिक महत्त्व देखील आहे. तुळशीला सर्दी, ताप, खोकला यासाठी उपयुक्त मानले जाते. म्हणूनच, तुळशी विवाह निसर्गाशी तसेच आरोग्याशी नाते जोडणारा आहे. आज या धावपळीच्या जीवनात लोकसंख्या वाढताना पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे. आज कित्येक झाडे तोडली जातात. पण तुळशी विवाहासारखा सण आपल्याला वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगतो. म्हणूनच, प्रत्येकाने तुळशीचे रोप लावून पर्यावरणाचे पूजन केले पाहिजे. कारण, प्रत्येक घरात तुळस असली तर ऑक्सिजनचा पुरवठा नैसर्गिक पद्धतीने होतो आणि त्यामुळे शांती नांदते.
तुळशी विवाहासारख्या सणाच्या निमित्ताने पुरातन काळातील वृंदा देवी यांच्याकडून आपण सत्य आणि धर्मनिष्ठा ही तत्त्वे शिकू शकतो. तसेच जेव्हा देवीने आपल्या पतीचा मृत्यू झाल्यावर, आत्मत्याग करून निसर्गाचे रूप धारण केले. यातून आपण निसर्गाशी एकरूप आहोत, हा संदेश घेऊ शकतो. तसेच एका स्त्रीच्या निष्ठेमुळे देवांनाही तिला तुळशीच्या रूपात अमरत्व दिले, हे स्त्रीशक्तीचे दैवी रूप आहे, हेच महत्त्व हा सण व्यक्त करतो. त्यामुळे आज प्रत्येकाने वृंदा देवीसारखी निष्ठा, श्रद्धा आणि त्यागभाव आत्मसात केला पाहिजे, तेव्हाच प्रत्येक घर तुळशीसारखे पवित्र आणि सुगंधित बनेल.
आज तुळशी विवाहासारख्या सणातून मुलांना संस्कृतीची शिकवण मिळू शकते. कारण या सणाद्वारे श्रद्धा, विज्ञान आणि पर्यावरण यांचा संगम घडतो. म्हणूनच, प्रत्येकाने तुळशी विवाह साजरा करताना केवळ धार्मिक विधी म्हणून नव्हे, तर निसर्गप्रेम, आरोग्य आणि कुटुंबातील ऐक्य वाढविणारा एक उत्सव म्हणून साजरा करावा.
म्हणूनच, या तुळशी विवाहाच्या प्रसंगी आपण म्हणूया की,
पुराणकाळातून चालत आलेला तुळशी विवाह आजही संस्कारमय रीतीने संपन्न होत आहे, श्रद्धेचा, ऐक्याचा, आणि सामूहिकतेचा हा सोहळा आनंदाची नाती गुंफतो आहे.

पूजा भिवा परब
पालये, पेडणे-गोवा