गर्भधारणेआधी शरीराची तयारी का करावी?

गर्भधारणेपूर्वी शरीराची तयारी म्हणजे केवळ शारीरिक तयारी नाही, तर आहार, मानसिक आरोग्य, जीवनशैली आणि वैद्यकीय काळजी यांचा समतोल साधणे आहे.

Story: आरोग्य |
9 hours ago
गर्भधारणेआधी शरीराची तयारी  का करावी?

गर्भधारणा ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया नसून ती शरीर, मन आणि जीवनशैलीतील मोठा बदल असतो. निरोगी बाळासाठी निरोगी आई आणि वडील दोघांची तयारी अत्यावश्यक असते. गर्भधारणेआधीच्या काळात केलेली योग्य शारीरिक, मानसिक आणि आहारविषयक तयारी सुसह्य गर्भारपणास मदत करते, प्रसूतीनंतरच्या अडचणी कमी करते व बाळाच्या विकासावर थेट परिणाम करते. हीच गर्भधारणेपूर्व शरीर, मन आणि जीवनशैलीची सखोल तयारी का अन् कशी करावी याबद्दल आज आपण जाणून घेऊ.

गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी पुढील गोष्टी महत्त्वाच्या असतात:

  • पोषण आणि आहार
  • गर्भधारणेपूर्वी योग्य पोषण मिळणे हे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल असते.
  • फॉलिक अॅसिड: गर्भधारणा होण्यापूर्वी किमान ३ महिने फॉलिक अॅसिड 
  • घेण्यास सुरू करावे. हे बाळाचे मेंदू व मेरुरज्जूच्या (न्युरल ट्युब) विकारांपासून संरक्षण करते.
  • लोह: शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन असणे आवश्यक आहे, कारण गर्भधारणेदरम्यान रक्ताचे प्रमाण वाढते.
  • कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी: हे हाडे मजबूत राहण्यासाठी आणि बाळाच्या हाडांच्या विकासासाठी महत्त्वाचे असते.
  • ओमेगा-३: मेंदू आणि डोळ्यांच्या विकासासाठी आवश्यक असते. हे फिश ऑइल, अळशीच्या बियांतून मिळते.

संतुलित आहार कसा असावा?

दिवसातून ४-५ वेळा हलका पण पौष्टिक आहार घ्यावा. साखर, मिठ आणि तेलाचे प्रमाण कमी ठेवावे.

दूध, दही, डाळी, हिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा आहारात असावा. लोहयुक्त पदार्थ खावेत. उदा. बीट, पालक, खजूर, गुळ. कॅल्शियम आणि प्रथिने आहारात असावीत. उदा. दूध, पनीर, अंडी, डाळी.

जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, जास्त तेलकट पदार्थ टाळावेत.

पुरेसे पाणी प्यावे (दररोज २-३ लिटर).

वजन नियंत्रण

अतिरिक्त वजन (ओबेसीटी) किंवा कमी वजन (अंडरवेट) दोन्हीही गर्भधारणेस अडथळा ठरू शकतात. नियमित हलका व्यायाम (उदा. चालणे, योग, प्राणायाम) केल्याने शरीर सशक्त व लवचिक राहते.

जास्त वजन असल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि गर्भधारणेतील गुंतागुंती वाढू शकतात.

कमी वजन असल्यास बाळाचा विकास नीट होत नाही. म्हणून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य व्यायाम, आहार आणि जीवनशैली ठरवणे आवश्यक असते.

व्यायाम, योग आणि शरीरसौष्ठव

गर्भधारणा सहज होण्यासाठी शरीर सशक्त, लवचिक आणि ऊर्जावान असणे गरजेचे आहे. यासाठी, दररोज ३० मिनिटे चालावे, श्वसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राणायाम करावे, बटरफ्लाय पोझ, ताडासन, भुजंगासन यासारखी योगासने करावीत, स्नायू मजबूत ठेवण्यासाठी हलके स्ट्रेचिंग करावे.

व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, हार्मोन्स संतुलित राहतात आणि गर्भधारणेची शक्यता वाढते.

अपायकारक सवयींचा त्याग

धूम्रपान, मद्यपान, तंबाखू, कॅफिनचे अति सेवन या गोष्टी गर्भधारणेवर आणि बाळाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करतात.

कोणतीही औषधे, हर्बल सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. घेत असल्यास गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांकडून योग्य सल्ला घ्या.

पर्यावरणातील विषारी पदार्थांपासून (उदा. कीटकनाशके, रासायनिक वायू) लांब राहावे.

मानसिक तयारी

गर्भधारणा ही केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक प्रवास असतो. सकारात्मक विचार ठेवावेत.

ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान, योग, वाचन, संगीत उपयोगी ठरते. जोडीदारासोबत खुलेपणाने संवाद साधावा.

हार्मोनल संतुलन आणि पाळीचे निरीक्षण

पाळी अनियमित असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अंडोत्सर्जनाचा (ओव्युलेशन) अंदाज ठेवण्यासाठी ओव्ह्युलेशन ट्रॅकिंग अॅप किंवा कॅलेंडरचा वापर करा.

जीवनशैली आणि झोप

दिवसातून किमान ७-८ तास झोप आवश्यक असते.

मोबाईल/लॅपटॉपचा अति वापर, रात्री उशिरापर्यंत जागरण टाळावे.

नियमित वेळेत आहार आणि झोप ठेवावी.

गर्भधारणेआधी करायच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या 

गर्भधारणा करण्यापूर्वी महिलेने आणि जोडीदाराने डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी. या तपासण्यांमुळे संभाव्य अडचणी (उदा. अ‍ॅनिमिया, थायरॉईड, संसर्ग) आधीच समजू शकतात आणि उपचार करून गर्भधारणा सुरक्षित करता येते.

हिमोग्लोबिन: रक्तातील लोहाची पातळी तपासणे आवश्यक असते.

थायरॉईड: थायरॉईड विकार असल्यास गर्भधारणेत अडचण येऊ शकते.

ब्लड शुगर: मधुमेह नियंत्रणात असल्याची खात्री करावी

व्हिटॅमिन डी व बी १२: कमी असल्यास थकवा, हाडे कमजोर होतात.

रक्तगट आणि आर एच घटक: आर एच निगेटिव्ह असल्यास पुढे विशेष काळजी घ्यावी लागते.

पेल्विक तपासणी/ गर्भाशय व अंडाशयाचे अल्ट्रासाऊंड : पीसीओएस, फायब्रॉईड, गर्भाशय, अंडाशय किंवा पाळीशी संबंधित विकार ओळखता येतात.

दातांची तपासणी: संसर्ग टाळण्यासाठी दात आणि हिरड्यांचे आरोग्य तपासावे.

एच आय व्ही, हॅपॅटायटिस बी, सी, सिफिलिस चाचण्या.

रुबेला प्रतिकारक क्षमता तपासणी: जर प्रतिकारकता नसल्यास एम एम आर लस घेणे आवश्यक आहे आणि लसीनंतर 1 महिना गर्भधारणा टाळावी.

एचपीव्ही लसेचा गर्भधारणेपूर्व पूर्ण कोर्स करावा, व्हॅरिसेला लस गर्भधारणेच्या कमीतकमी एक महिन्याआधी व हिपॅटायटिस बी लस डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.

गर्भधारणेपूर्वी शरीराची तयारी म्हणजे केवळ शारीरिक तयारी नाही, तर आहार, मानसिक आरोग्य, जीवनशैली आणि वैद्यकीय काळजी यांचा समतोल साधणे आहे. योग्य तयारीमुळे गर्भधारणा सहज होते, बाळ निरोगी जन्मते व आईचे आणि बाळाचे आरोग्य उत्तम राहते.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर