एका निष्पाप पिल्लाच्या येण्याने एका कुटुंबात आनंद फुलला. मालकांनी सोडले तरी त्याची निष्ठा ढळली नाही. ही आहे यशची, न बोलता मनात घर करणाऱ्या प्रेमाची आणि निष्ठेची कहाणी.

यशला पुरत असताना आई ओक्साबोक्सी रडत होती. तिची ती केविलवाणी अवस्था पाहून शिवानीला मनातून खूप वाईट वाटले. तिच्या डोळ्यासमोर आईचा तो अश्रूंनी भरलेला चेहरा येताच, तिच्या मनात ठाम विचार आला, ‘यापुढे आपल्या घरात कधीच पाळीव प्राणी आणायचा नाही.’
आता तुम्हाला यशबद्दल सांगते. आमच्या घराच्या मागच्या बाजूला एका जुन्या ढोलीत एका सुंदर टुमटुमीत पिल्लाचा जन्म झाला होता. तो एकुलता एक असल्याने आईचे भरपूर दूध पिऊन अगदी गोलमटोल झाला होता. त्याच्या छोट्या नाकावर आणि कानांवर मध्येच पांढरे ठिपके होते, आणि तपकिरी मातीच्या रंगात तो इतका सुंदर दिसत होता की कोणालाही त्याचा लळा लागावा!
माझ्या आईला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आला नाही. ती त्या पिल्लाला उचलून घरी घेऊन आली. पण मला कुत्रा किंवा मांजर पाळणे फारसे आवडत नव्हते. मी थोडी नाराज झाले, म्हणून आईने आमच्या शेजाऱ्यांना ते पिल्लू दाखवले. त्यांनाही ते पहिल्याच नजरेत भलतेच आवडले. त्यांनी प्रेमाने त्याचे नाव ठेवले ‘यश’ कारण त्यांच्या घरात नुकताच व्यवसाय सुरू झाला होता आणि त्या पिल्लाच्या आगमनाने त्यांना वाटले, यश त्यांच्या दारी येईल!
सुरुवातीच्या काही दिवसांत त्यांनी यशचे अगदी लाड केले. त्याला रोज मांसाहारी चविष्ट पदार्थ मिळायचे, मऊ गादीवर झोपायला मिळे, आणि गळ्यात त्यांनी अप्रतिम डिझाईनचा पट्टा बांधला होता. सगळ्यांना वाटायचे, यश हे खरे तर त्यांच्या घराचे लाडके लेकरू आहे. पण हळूहळू परिस्थिती बदलली. त्यांच्या व्यवसायात नफा होण्याऐवजी मोठा तोटा झाला. घरात तणाव वाढला आणि त्यांनी दुसऱ्या शहरात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्या गडबडीत त्यांनी ठरवले, यशला सोबत घेऊन जाता येणार नाही. एके दिवशी त्यांनी यशला गाडीत बसवले, काही अंतरावर एका दूरच्या गावात नेऊन सोडले... आणि निघून गेले.
बिचारा यश, काहीच न कळता, त्या ठिकाणीच मालकाची वाट पाहत बसला. त्याला वाटले, ‘माझी माणसं मला न्यायला परत येतील.’ पण दिवस गेले, रात्री गेल्या, आणि तो तिथेच राहिला. अन्नाशिवाय, पाण्याशिवाय, चार दिवसांनंतर त्याचे शरीर अगदी कृश झाले. पण त्याची निष्ठा, त्याचा विश्वास? तो मात्र कायम होता.
दरम्यान, आमच्या आईला ही गोष्ट समजली. तिने तत्काळ त्या शेजाऱ्यांना फोन करून विचारले आणि बाबांना घेऊन त्या गावात पोहोचली. पाहते तर काय? तो बिचारा यश, तसाच चुपचाप बसलेला, डोळ्यांत आस आणि शेपटी हलवत आईकडे पाहत होता! आईच्या डोळ्यात पाणी आले. तिने त्याला मिठीत घेतले आणि म्हणाली, “यश, आता तुला कोणी सोडणार नाही.”
आई-बाबा त्याला घरी घेऊन आले. त्या दिवसानंतर तो आमच्या घरचा अविभाज्य सदस्य बनला. आई तर त्याच्यावर एवढी माया करू लागली की मीच जणू दुय्यम ठरले! पण मला राग आला नाही, कारण यशची निष्ठा खरंच अपूर्व होती. शिवानी कॉलेजमधून परत येईपर्यंत तो जेवत नसे. ती अभ्यास करत बसली की तिच्या पायाशी येऊन झोपे. त्याचे ते प्रेमळ डोळे, शांत श्वास घरात मायेचा एक अविरत प्रवाह निर्माण करत.
एकदा बाबांना आजारपणामुळे दवाखान्यात दाखल करावे लागले, आणि त्या वेळी शिवानी आणि यश दोघेच घरी होते. रात्री उशिरा कुणीतरी दरवाज्याशी आवाज केला तेव्हा यशने लगेच दक्षतेने दरवाजाजवळ धाव घेतली. त्याचा सतर्क भुंकण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि सगळे शांत झाले. त्या दिवसानंतर शिवानीला जाणवले, हा फक्त पाळीव प्राणी नाही, तर माझा खरा रक्षक आहे.
काळ पुढे सरकला, पण यशचे आईवरचे प्रेम कमी झाले नाही. सकाळी आई उठली नाही की तो तिच्या अंगावर पंजा ठेवून उठवायचा. आजारी असताना तो तिच्या बाजूला बसून राहायचा. आणि एक दिवस... यशची ती शेवटची सकाळ आली. वयामुळे तो थकला होता, पण डोळ्यांत तीच ओळखीची माया होती. आईच्या मांडीवर डोके ठेवून त्याने शेवटचा श्वास घेतला. आई ओक्साबोक्सी रडत होती. त्या क्षणी शिवानीला उमजले, निष्ठा आणि प्रेमाला जाती, रूपे, प्रजाती नसतात.
त्या दिवसानंतर शिवानीने ठरवले, ‘आता आपल्या घरात कुठलाच प्राणी आणायचा नाही,’ पण मनाच्या आत कुठेतरी यशचे स्थान कायमचे कोरले गेले होते.

गौरी रोशन वेर्लेकर