शेळवण कुडचडेतील जेटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा तीव्र विरोध

आमदार नीलेश काब्राल यांची घेतली भेट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16 hours ago
शेळवण कुडचडेतील जेटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा तीव्र विरोध

केपे : शेळवण कुडचडे येथे जुवारी नदीत होऊ घातलेल्या दोन जेटींना लोकांनी तीव्र विरोध केला आहे. शनिवारी स्थानिक लोकांनी कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांची भेट घेऊन सदर जेटी कोळसा हाताळण्यासाठी असून ही जेटी कोणत्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नसल्याचे त्यांनी काब्राल यांना सांगितले. काब्राल यांनीही आपण तुमच्याबरोबर असल्याचे सांगितले. जे प्रकल्प लोकांना नको ते आपल्यालाही नको असून याविषयी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेळवण कुडचडे येथे जुवारी नदीवर दोन जेटीचे बांधकाम फक्त कोळसा हाताळण्यासाठी होणार असल्याची शक्यता आहे. यामुळे या जेटी आमच्या गावात आम्ही होऊ देणार नसल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. सदर जेटींना पूर्वीपासून विरोध असून आता परत एकदा हा प्रश्न उपस्थित झाल्याने लोकांच्या मनात याविषयी भीती निर्माण झाली आहे, असे मनोज नाईक यांनी सांगितले. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत शेळवण येथील लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे, असे नाईक यांनी काब्राल यांना सांगितले. याविषयी आम्ही राष्ट्रीय हरित लावादात गेलो असून या जेटींचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न होत असल्याने आमदारांनी यात हस्तक्षेप करून हे काम बंद पाडावे, अशी मागणी नाईक यांनी केली.

शेळवण येथील हा प्रकल्प लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत असल्याने आम्ही आमदार काब्राल यांना भेटायला आलो होतो, असे सरपंच किस्तोद फर्नांडिस यांनी सांगितले. शेळवण गावात रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम होणार होते परंतु पुलाची रुंदी पाहता त्यावरून मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक होणार असल्याचा लोकांना संशय आल्याने त्यांनी या पुलाला विरोध केला होता. स्थानिक लोकांना या भागात कोळसा कोणत्याही परिस्थितीत नको असल्याने आमदारांनी हा प्रकल्प बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे फर्नांडिस यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई तसेच इतर स्थानिक लोकांनी विचार व्यक्त केले.

लोकांना नको असलेले प्रकल्प आम्हालाही नको : काब्राल

आपण लोकांबरोबर असून लोकांना नको असलेले प्रकल्प आपल्यालाही नको, असे आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन याविषयी चर्चा करणार आहे. शेळवण येथील लोकांनी सदैव आपल्याला पाठिंबा दिला असल्याने त्यासाठी आपण तुमचे ऋणी आहे. गरज पडल्यास लोकांना घेऊन मुख्यमंत्री सावंत यांचे भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा