वाळपईचे टपाल कार्यालय चोरांकडून लक्ष्य

खिडकीचे लोखंडी रॉड कापून १ लाख रुपयांची रक्कम लंपास

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16 hours ago
वाळपईचे टपाल कार्यालय चोरांकडून लक्ष्य

वाळपई : येथील टपाल कार्यालयात शुक्रवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली. चोराने इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे लोखंडी रॉड कापून आत प्रवेश केला व सुमारे १ लाख ९ हजार ८३० रुपयांची रोकड पळवली. तसेच कार्यालयातील इतर वस्तू आणि काही महत्त्वाचे दस्तऐवज चोरीला गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे वाळपई परिसरात खळबळ उडाली असून, गुंतवणूकदार व नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शनिवारी सकाळी कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातील वस्तू अस्ताव्यस्त दिसल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. तपासणीदरम्यान इमारतीच्या मागील खिडकीचे लोखंडी रॉड कापलेले आढळले तसेच तिजोरी फोडून रोकड चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला असला तरी अद्याप चोरांचा शोध लागलेला नाही.

टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी तिजोरी फोडण्याबरोबरच अनेक कागदपत्रे आणि उपकरणे अस्ताव्यस्त फेकली होती. त्यामुळे महत्वाचे दस्तऐवज चोरीस गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली असून तपास सुरू आहे.

इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण

स्थानिक नागरिकांनी टपाल कार्यालयाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण असून परिसर निर्मनुष्य आहे. तसेच येथे अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. अनेक वेळा सुधारणा करण्याच्या मागण्या झाल्या तरी अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


हेही वाचा