मॅनेजर, बाऊन्सरविरुद्ध गुन्हा नोंद

म्हापसा : वागातोर येथील रोमियो लेन रेस्टॉरंटमध्ये वाराणसी उत्तर प्रदेशमधील पर्यटकांना मारहाण तसेच विनयभंगाचा प्रकार घडला. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी रेस्टॉरंटचे मॅनेजर अजय कवटीकर, जुनेद अली व बाऊन्सर कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना रविवार, दि. २ रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वैभवी चंडेल हिने पोलिसांत तक्रार दिली आहे. घटनेच्या वेळी फिर्यादी कुटुंब रोमियो लेन रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. तिथे क्षुल्लक कारणावरून संशयित आरोपीने या कुटुंबासोबत वाद घातला. आपल्या बाऊन्सर कर्मचाऱ्यांना बोलावून फिर्यादीचा भाऊ युवराज चंडेल, श्रीनिवास सिंग यांना मारहाण केली. तसेच फिर्यादींच्या कानपटीत मारून तिचा टीशर्ट ओढला तसेच शिवांगी सिंग हिला धक्का दिला.
याप्रकरणी पोलिसांनी वरील संशयितांविरुद्ध भा.न्या.स.च्या कलमांतर्गत ३५२, ११८(१), ७४ व ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.