पोलीस अधीक्षकांच्या बदलीसह सखोल चौकशीची मागणी

मडगाव : एडबर्ग परेरा याला पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने गुन्हा केलेला असल्यास कायद्याने कारवाई होण्याची गरज होती पण तसे झालेले नाही. त्यामुळे मारहाण करणार्या पोलिसांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे नोंद व्हावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
नावेली येथे एडबर्ग परेरा याला झालेल्या मारहाणप्रकरणी मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. यावेळी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. प्रतिमा कुतिन्हो, शंकर पोळजी, महेश नायक, साविओ कुतिन्हो, फिडॉल परेरा यांच्यासह एडबर्गचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले की, पोलिसांनी कायद्याचे पालन न करता केलेली मारहाण ही एडबर्गच्या जीवावर बेतलेली आहे. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आहे. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही, असेही स्पष्ट केले.
एडबर्ग याला साखळीने बांधण्याच्या कृतीचा निषेध करण्यात आला. पूर्णपणे बरे झाल्याशिवाय डिस्चार्ज नको. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आवश्यक कलमांखाली गुन्हा नोंद करावा. पोलीस अधीक्षकांना राज्याबाहेर पाठवण्यात यावे. सखोल चौकशी करण्यात यावी, राज्याबाहेरील अधिकारी नको तर राज्यातील पोलिसांना अधिकार पदे द्यावीत, मारहाण केलेले हत्यार जप्त करावे, अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.
पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांच्याकडून घटनेला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याकडून चौकशी सुरू असताना मारहाण झालेली नसून तोल जाऊन पडल्याने एडबर्गला दुखापत झाल्याचे सांगणे चूक आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी सार्वजनिक करावे, तसेच चुकीची वक्तव्ये करणार्या पोलीस अधीक्षकांना दुसर्या राज्यात पाठवण्यात यावे, अशी मागणी अँथनी डिसिल्वा यांनी केली.
शंकर पोळजी यांनी सांगितले की, विचारणा करण्यास गेलो असता पोलीस ठाण्यात प्रवेश दिला नाही. प्रश्नांची उत्तरे नसल्याने पोलिसांनी ही कृती केली. पोलिसांकडून गुन्हेगारांना मारण्यात येत नाही पण सर्वसामान्यांना मारहाण होणे हे निषेधार्ह आहे. या पोलिसांना बडतर्फ करण्यात यावे. पोलिसांना आमदार, मंत्र्यांचा पाठिंबा असल्याने हे होत आहे. यापुढे शांततेत मोर्चा होणार नाही तर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढावा लागेल, असे सांगितले. लोकांनी कायदा हातात घेण्याच्या आधी पोलिसांनी लोकांशी सौजन्याने वागावे व लोकांना त्रास देऊ नये, अशी मागणी महेश नायक यांनी केली.
पोलिसांकडे याचना केली होती पण त्यानंतरही पोलिसांनी पायात चेन बांधून त्याला मारहाण केली. प्रकरण मिटवण्याबाबत सांगूनही त्यांनी ऐकलेले नाही व शेवटी मुलाला इस्पितळात दाखल करावे लागले, असे सांगत आपल्या मुलाची तब्बेत चांगली राहावी, यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी, असे एडबर्ग याची आई व्हिओला परेरा यांनी सांगितले.
नावेलीच्या मोर्चात घेण्यात आलेले ठराव
मारहाण करणार्या पोलिसांवर जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची कलमे लावावीत. चौकशी सुरू असेपर्यंत निलंबित पोलिसांना सेवेत घेऊ नये. चुकीची वक्तव्ये करणार्या पोलीस अधीक्षकांची बदली करावी. गोमंतकीय पोलिसांना अधिकारी म्हणून आणावे. सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावे. तसेच पूर्ण बरे होईपर्यंत एडबर्गला डिस्चार्ज देऊ नये, असे ठराव सर्वानुमते घेण्यात आले.