जमीन हडपप्रकरणी ईडीने गोठवल्या १९३.४९ कोटी रुपयांच्या मालमत्ता

मोहम्मद सुहैलशी संबंधित २४ मालमत्ता कायम जप्त करण्याचा आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
जमीन हडपप्रकरणी ईडीने गोठवल्या १९३.४९ कोटी रुपयांच्या मालमत्ता

पणजी : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल याच्याशी निगडित असलेल्या बार्देश तालुक्यातील तात्पुरती जप्त केलेली १९३.४९ कोटी रुपयांच्या २४ मालमत्ता कायम जप्त करण्याचा आदेश संबंधित प्राधिकरणाने दिला आहे. या पूर्वी याच प्रकरणात ईडीने ३९.२४ कोटींच्या ३१ मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत एकूण २३२.७३ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केली गेली आहे.
राज्यात बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी हडप केल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) २०२२ मध्ये स्थापना केली. त्यानंतर या प्रकरणात एसआयटीने ५१ गुन्हे दाखल करून चौकशी केली आहे. या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा संशय व्यक्त करून ईडीने म्हापसा पोलीस स्थानकात दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांची प्राथमिक चौकशी करून लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत कारवाई सुरू केली. ईडीने मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहेल, राजकुमार मैथी, विक्रांत शेट्टी आणि इतरांनी बळकावलेल्या ३९.२४ कोटींच्या ३१ मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर ईडीने न्यायालयात वरील संशयितासह इतरांविरोधात आरोपपत्र दाखल केले. दरम्यान, ईडीने वरील मालमत्ता तात्पुरती जप्त केली. या संदर्भात आता नवी दिल्ली येथील अॅडजुडीकेटिंग अॅथॉरिटीने वरील मालमत्ता कायम जप्त करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात एकूण २३२.७३ कोटी रुपयाची मालमत्ता जप्त केली गेली आहे.
१९३ कोटींच्या मालमत्तेची जप्ती
ईडीने अधिक तपास केल्यावर मोहम्मद सुहैल उर्फ मायकल याच्याशी निगडित असलेल्या बार्देश तालुक्यातील आणखी १९३.४९ कोटी रुपयांची २४ मालमत्ता शोधून काढल्या. संशयितांनी या मालमत्तांच्या संदर्भात फक्त १६ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल दाखवली होती, पण ईडीने या मालमत्तांचे मूल्य १९३.४९ कोटी रुपये असल्याचा दावा केला. यात म्हापसा, आसगाव, हणजूण, कळंगुट, नेरूल आणि पर्रा परिसरातील मालमत्तेचा समावेश आहे. 

हेही वाचा