
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाचे संकेत देत आहेत. मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने १० जागा जिंकत आपली पकड कायम ठेवली असली, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) भोपळाही फोडू शकली नाही. मात्र, पराभव असूनही मनसेच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, विशेषतः मुंबईतील मराठी भाषिक पट्ट्यांमध्ये ही वाढ दिसून येते.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकासाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यानंतर आता राज्यातील २९ महानगरपलिकांच्या निवडणुका डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीचे कयास बांधले जात असताना राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या भेटी होत आहेत. राज्यात आगामी काळात मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे दोन्ही पक्षांतील युतीची शक्यता अधिकच बळावली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मनसेबरोबरच्या युतीबद्दल सातत्याने सकारात्मक विधाने केली जात आहेत.
मुंबईतील २२७ प्रभागांपैकी तब्बल ६७ प्रभागांमध्ये मनसेने निर्णायक भूमिका बजावली. राजकीय विश्लेषकांच्या मते, जर मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांनी युती केली, तर उद्धव ठाकरेंचा गट ३९ प्रभागांमध्ये आपली स्थिती अधिक मजबूत करू शकतो, तर उर्वरित २८ प्रभागांमधील महायुतीचे गणितही कोलमडू शकते.
मनसेचा प्रभाव मराठी भाषिक मतदारसंघांमध्ये स्पष्टपणे जाणवतो. वरळी, दादर, माहीम, विक्रोळी, दिंडोशी आणि मालाड या भागांमध्ये मनसेची मते मविआच्या उमेदवारांच्या एकतृतीयांश इतकी आहेत. या भागांतील मतांचे प्रमाण पाहता, मनसेला केवळ पालिकेच्या निवडणुकीत काही जागा मिळवण्याची नव्हे, तर सत्तेच्या समीकरणावर परिणाम घडवण्याचीही ताकद आहे.
मनसे-उबाठा युती झाल्यास, मविआचा मुंबईतील मतविभाग अधिक स्थिर होऊ शकतो. परंतु, अशी युती झाली नाही तर मनसेचा स्वतंत्र लढा दोन्ही आघाड्यांच्या समीकरणात बिघाड निर्माण करू शकतो. विशेषतः कोकणी, मराठी आणि मध्यमवर्गीय मतदार असलेल्या प्रभागांमध्ये मनसेची मतविभाजनाची ताकद निर्णायक ठरू शकते. राजकीय तज्ज्ञांच्या मते, मुंबई मनपा निवडणुकीसाठी आता सर्व पक्षांची नजर मनसेकडे लागली आहे. उद्धव ठाकरे गटासाठी ही युती सत्ता परत मिळवण्याची संधी ठरू शकते, तर शिंदे-भाजप महायुतीसाठी ती मोठी डोकेदुखी ठरू शकते.
- प्रसन्ना कोचरेकर