पर्यटक सुरक्षा, कायदा सुव्यवस्थेवर मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

पणजी : पर्यटक (Goa Tourist) कितीही दारू प्यालेला असला तरी हॉटेल वा क्लबच्या कर्मचाऱ्यांनी त्याला हात लावता कामा नये. कायदा हातात न घेता त्यांच्या वर्तनाची तक्रार पोलिसांकडे करावी, असे कळंगुटचे (Calangute) आमदार मायकल लोबो (Mla Michal Lobo) यांनी म्हटले आहे.
पर्यटकांची सुरक्षा तसेच कायदा सुव्यवस्था प्रश्नावर मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे लोबो यांनी म्हटले आहे.
गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ (जीएसआयडीसी) अध्यक्षपदाचा मायकल लोबो यांनी मंगळवारी ताबा घेतला. यानंतर बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.
काही पर्यटक हॉटेल वा क्लबमध्ये गैरवर्तन करतात. तरी हॉटेल वा क्लबच्या कर्मचाऱ्यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्राधान्याने विचार करायला हवा.
हणजूण पोलीस निरीक्षकांसमवेत आमदार दिलायला लोबो व कळंगुटचा आमदार या नात्याने आमची बैठक झालेली आहे. गैरवर्तन करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना देणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे मायकल लोबो म्हणाले.
सुरू असलेले प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार
गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे ज्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत, ती डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. कामाचा दर्जा व प्रगतीचा आढावा मी घेणार आहे, असे मायकल लोबो अध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर म्हणाले. प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरूस्ती कामे व इस्पितळांच्या कामांना प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले.