
जोधपूर (राजस्थान) : महाराष्ट्रातील (Maharshtra) शेतकरी (Farmer) हे शेतीची लागवड करताना जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी कर्ज घेऊन जोखीम उचलतात. राजस्थानी (Rajsthan) शेतकरी असा अनिष्ठ धोका घेत नाही.
यामुळे इथे एकही शेतकरी आत्महत्या करत नाही. 'मारवाडी मानसिकता' ही महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येची समस्या सोडवू शकते, असे मत जोधपूर केंद्रीय शुष्क क्षेत्र संशोधन संस्थचे (ICAR) (Central Arid Zone Research Institute - CAZRI), संचालक डॉ. एस. पी. एस. तन्वर यांनी व्यक्त केले.
माहिती प्रसार विभागाच्या (पीआयबी) उपक्रमांतर्गत झालेल्या भेटीदरम्यान पत्रकारांशी ते बोलत होते. राजस्थानात महाराष्ट्राच्या तुलनेत खूपच कमी पाऊस (Rain) आणि आव्हानात्मक वातावरण असतानाही, या प्रदेशात एकही शेतकरी शेतीमुळे आत्महत्या झाल्याची घटना घडलेली नाही, असे डॉ. तन्वर म्हणाले.
राजस्थानासारख्या कोरड्या प्रदेशात फक्त २०० मिमी ते ६०० मिमी पाऊस पडतो, पण येथील लोकांना पाण्याची किंमत माहित असल्याने त्यांनी विविध पावसाचे पाणी साठवण्याच्या तंत्रांचा म्हणजेच पाणी जिरवा पाणी अडवाचा विकास केला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात चांगला पाऊस असूनही, पीके अपयशी ठरल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वारंवार घडताना दिसतात.
स्वतः मारवाडी समुदायी असलेले तन्वर हे विनोदी शैलीत म्हणाले की, “मारवाडी मानसिकता” म्हणजे पैसे साठवणे आणि कमी खर्च करणे, हीच गोष्ट राजस्थानातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानापासून वाचवते.
महाराष्ट्रातील शेतकरी हे अधिक धोके पत्करतात आणि मोठ्या गुंतवणुकीसह भरघोस उत्पादनाचे प्रोजेक्शन करतात. परंतु राजस्थानातील शेतकरी आपल्या मर्यादेत राहून शेती करतात.
“हे शेतकरी धोका घेत नाहीत. मारवाडी मानसिकता अशी आहे, की जेव्हा पैसे कमवाल तेव्हाच पैसे गुंतवा किंवा खर्च करा, कमाईच्या अपेक्षेवर आधीच गुंतवणूक करू नका, असे ते म्हणाले.
राजस्थानात विविध जलसंधारण पद्धती पोहोचवण्याचे तन्वर यांनी श्रेय महाराष्ट्राला दिले. रेनवॉटर हार्व्हेस्टिंगची सुरुवात महाराष्ट्रात झाली आणि नंतर राजस्थानाने ती तंत्रे अनुकरण केली. असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या ‘शेतीतून करोडो कमाई’च्या चित्राऐवजी जमिनीवरील वास्तव समजावून सांगितले पाहिजे.
पिकांत अपयश झाल्यास आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतीत विविधता (diversification) असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.