मुंबई-मंगळूर मार्गावरील बसमधुन सोने आणि तब्बल ५० लाख रुपयांची रोकड जप्त

भटकळ पोलिसांची पुन्हा धडक कारवाई!

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
2 hours ago
मुंबई-मंगळूर मार्गावरील बसमधुन सोने आणि तब्बल ५० लाख रुपयांची रोकड जप्त

भटकळ: मुंबई-मंगळूर मार्गावर धावणाऱ्या एका खासगी बसमधून भटकळ पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत सोनं आणि रोकडचा मोठा साठा जप्त केला आहे. रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना या बसची तपासणी करण्यात आली असता, एका साध्याशा दिसणाऱ्या सूटकेसमधून सुमारे ४०१ ग्रॅम वजनाच्या ३२ सोन्याच्या बांगड्या आणि ५० लाख रुपये रोकड पोलिसांना मिळाली.

बसचालकाकडे अनोळखी व्यक्तीने दिली होती सूटकेस

या घटनेनंतर बसचालकाला भटकळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील एका अनोळखी व्यक्तीने ही सूटकेस बसचालकाला दिली होती आणि 'मंगळूर बसस्थानकात आमचे लोक येऊन ती घेतील,' असे सांगितले होते. साध्या 'स्वीट बॉक्स' पॅकिंगसारखी दिसणारी ही सूटकेस चालकाने बेमालूमपणे बसमध्ये ठेवली होती. मात्र, भटकळमध्ये पोलिसांच्या तपासणीदरम्यान हा सगळा प्रकार उघड झाला.

सोने तस्करी आणि काळ्या पैशाचा संशय

एवढी मोठी रक्कम आणि सोने असलेली सूटकेस एका अनोळखी व्यक्तीकडे देणे, तसेच वाढत्या चोरी-दरोड्याच्या काळात ही कृती करणे याबद्दल पोलिसांना मोठा संशय आहे. बसचालकाला याबद्दल खरंच काहीच माहिती नव्हती का? किंवा तोच या बेकायदेशीर वाहतुकीतील मुख्य व्यक्ती आहे का, याचा तपास पोलीस कसून करत आहेत.

सध्या भटकळ पोलिसांनी सोने आणि रोकड दोन्ही ताब्यात घेतले असून, या सूटकेसचा खरा मालक कोण, याचा शोध सुरू आहे. ही कारवाई काळा पैसा किंवा सोने तस्करीच्या दिशेने अधिक तपास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा