पाच खाण ब्लॉक्स कार्यान्वित

पणजी: गोव्यातील खाण व्यवसायाला पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने आता डम्प मालाच्या लिलावासाठी सुधारित धोरण तयार केले असून, त्यानुसार येत्या जानेवारीपासून लिलाव प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात जानेवारी महिन्यात १० डम्पचा लिलाव केला जाईल, अशी माहिती खाण संचालक नारायण गाड यांनी दिली आहे.
खाण व्यवसाय अधिक वेगाने सुरू व्हावा यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून, खासगी जमिनीवरील डम्प माल लिलाव करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या डम्प मालाची एकूण मात्रा २२ दशलक्ष टन इतकी आहे आणि याचा लिलाव जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. खाण ब्लॉकमधून खनिजाचे उत्खनन आणि डम्प मालाच्या निर्यातीमुळे खाण व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. यासाठी डम्पच्या लिलावासाठीचे शुल्कही निश्चित करण्यात आले आहे.
५ खाण ब्लॉक्स सुरू, उत्पादन वाढले
लिलाव झालेल्या एकूण १२ खाण ब्लॉकपैकी आतापर्यंत ५ ब्लॉक सुरू झाले आहेत. पूर्वी ३ ब्लॉक सुरू होते. आता ऑक्टोबर महिन्यापासून शिरगाव येथील राजाराम बांदेकर खाणी आणि जेएसडब्ल्यू (JSW) च्या कुडणे येथील मिनरल ब्लॉकमधून माल काढण्यास सुरुवात झाली आहे. या पाचही खाण ब्लॉकमधून दरवर्षी सुमारे ५.३ दशलक्ष टन एवढा खनिज माल काढला जाईल.
खनिज आणि डम्प मालाच्या निर्यातीमुळे खाण वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे. परिणामी, ट्रक आणि बार्जीसनाही मोठ्या प्रमाणात काम मिळून राज्यातील अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल.