
पणजी : गोव्यात (Goa) कुठलाही समुद्र किनारा ‘मासेमारी क्षेत्र’ (Fishing zone) म्हणून अधिसूचित (Notified) केला नसल्याचे मत्स्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पारंपारिक मासेमार (Traditional fishermen) गोव्यातील अनेक समुद्र किनाऱ्यांवर मासळी उतरवत असतात. त्या किनाऱ्यांवर मासळी उतरवण्याची तेवढीच जागा अधिसूचित करण्यात आली आहे.
पारंपारिक रापोणकार संघटनेने करंजाळे समुद्र किनारा ‘मासेमारी क्षेत्र’ म्हणून घोषित केला नसल्याचे व आता करावा अशी मागणी केली होती. त्यावर माहिती देताना मत्स्य खात्याच्या संचालक डॉ. शमिला मोंतेरो यांनी वरील माहिती दिली.
प्रत्यक्ष मासेमारी केल्या जाणाऱ्या क्षेत्रात पारंपारिक मासेमारी केल्यानंतर उतरवण्यासाठी सुलभ व्हावे, यासाठी तेवढीच जागा अधिसूचित करण्यात आली आहे. राज्यात कुठलेच क्षेत्र ‘मासेमारी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले नसल्याचे संचालक मोंतेरो यांनी स्पष्ट केले.
हा किनारा अतिक्रमण, ‘वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर्स’ व इतर उपक्रमांपासून वाचवण्यासाठी ‘मासेमारी क्षेत्र’ म्हणून अधिसूचित करावे, अशी मागणी करंजाळेतील रापोणकारांनी केली होती.
हल्लीच याठिकाणी आयोजित केलेल्या बेकायदेशीर जलतरण स्पर्धेमुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेले व मच्छीमारांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर या मागणीने जोर धरला होता.
मत्स्य खात्यानेही यासंदर्भात सविस्तर अहवाल मागविला होता. त्याचबरोबर मत्स्य खात्याने या स्पर्धेला अधिकृत परवानगी दिली नसल्याचेही स्पष्ट केले होते.
स्पर्धा आयोजनानंतर करंजाळे येथे अशा उपक्रमांना प्रतिबंध करावा, अशी मागणी करणारी अनेक निवेदने येत असल्याचेही सांगितले.
यापुढे अशा उपक्रमांना परवाना देण्यापूर्वी पारंपारिक मच्छीमारांना विश्वासात घेतले जाणार असल्याचे संचालक मोंतेरो यांनी स्पष्ट केले.