
पणजी : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण गोवा (The Goa Board of Secondary and Higher Secondary Education) बोर्ड दुसरी गोवा शिक्षक पात्रता चाचणी (जीटीइटी) (GTET) ९ व १० डिसेंबर रोजी घेणार आहे. या चाचणीला बसण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. एकूण तीन हजार उमेदवार या परीक्षेला बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात गोवा बोर्डाचे अध्यक्ष (Goa Board chairperson) भागीरथ शेट्ये यांनी सांगितले की, बोर्डाने दिव्यांगांचे नोंदणी शुल्क माफ केले आहे. आरक्षण गटाला केवळ ५० टक्के शुल्क भरावे लागणार आहे.
शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. १ हजार प्राथमिक शाळा स्तरावरील तर २ हजार माध्यमिक (सहावी ते आठवी) शाळा स्तरावरील उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. संगणकावर चाचणी घेण्यात येणार आहे. परीक्षा झाल्यावर लगेच निकाल उपलब्ध होणार आहे व विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले ते लगेच कळणार असल्याचे अध्यक्ष भागीरथ शेट्ये यांनी सांगितले. परीक्षा झाल्यावर बोर्ड उत्तरपत्रिका देणार व काही तफावत असल्याचे दिसून आल्यास आव्हान देण्यासाठी विद्यार्थ्यांना ८ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. त्यात काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शेट्ये यांनी स्पष्ट केले.