म्हादईच्या मुद्द्यावर दिल्लीत केंद्रासोबत चर्चेला यावे : मनोज परब यांना दिले आव्हान

पणजी: गोव्यात म्हादई नदी आणि वाढत्या स्थलांतरित लोकसंख्येच्या राजकारणावरून 'रिव्होल्युशनरी गोवन्स'चे (RG) प्रमुख मनोज परब आणि कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिद्धाण्णा मेटी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे. मेटी यांनी परब यांच्यावर गरिबांच्या नावावर राजकारण करण्याचा आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला, तर परब यांनी 'घाटी' शब्दाचा वापर गुन्हेगारांसाठी होत असल्याचे स्पष्ट केले.

म्हादई प्रश्नावर मेटींचा परब यांना थेट सवाल
सिद्धाण्णा मेटी यांनी परब यांच्या टीकेला उत्तर देताना म्हादई प्रश्नावर थेट आव्हान दिले. मेटी म्हणाले, म्हादई नदी गोव्यासाठी महत्त्वाची आहे, पण हा मुद्दा न्यायालयात आहे. जर मनोज परब यांनी पुढाकार घेऊन कर्नाटक सीमेवर जाऊन म्हादईसंदर्भात ठोस भूमिका घेतली तर मी सर्व कन्नड नागरिकांना या लढ्यात त्यांच्यासोबत येण्यास तयार आहे.
मेटींनी परब यांना आपल्यासोबत दिल्लीत केंद्रासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवावी असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, या राजकारणी लोकांना फक्त निवडणुकीच्या वेळीच म्हादईची आठवण येते. त्यांनी परब यांच्यावर स्थलांतरितांनाफक्त मतांसाठी लक्ष्य करत असल्याचा आणि ब्रिटिश राजवटीप्रमाणे फूट पाडून राज्य करत असल्याचा आरोपही केला.
परब-बोरकर यांचा मेटींवर पलटवार
यापूर्वी मनोज परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सिद्धाण्णा मेटींना म्हादई नदीविषयी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. ते स्वतःला गोवेकर मानत असतील, तर गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादईच्या विषयावर त्यांनी कर्नाटक सरकारला जाब विचारला पाहिजे, असे परब म्हणाले होते.
आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनीही भाजपवर टीका करताना भविष्यात परप्रांतीयांमुळे गोव्याच्या अस्मितेला मोठा धोका असल्याचे सांगितले. बोरकर म्हणाले की, पुढील ५ ते १० वर्षांत गोव्याच्या ४० आमदारांपैकी अनेक आमदार परप्रांतीय असतील. राज्यातील काही आमदारांनी वोटबँक तयार करण्यासाठी परप्रांतीयांच्या वस्त्या निर्माण केल्या. आज हेच लोक पंच, सरपंच बनले आहेत आणि लवकरच ते आमदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही,असे बोरकर म्हणाले.

'घाटी' शब्दावर स्पष्टीकरण
कन्नड महासंघाचे अध्यक्ष असलेल्या सिद्धाण्णा मेटी यांनी 'आम्हाला घाटी म्हणू नका' असे सांगत, 'उत्तर भारतीयांनी जमिनी खरेदी करून गोव्याचा नाश केला असताना, तुम्ही फक्त आमच्यासारख्या गरिबांनाच का लक्ष्य करता?' असा सवाल आरजीला केला होता.
यावर प्रत्युत्तर देताना मनोज परब यांनी स्पष्ट केले की, राज्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या परप्रांतीयांविषयी 'घाटी' हा शब्द वापरला जात नाही, तर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांसाठीच तो शब्दप्रयोग केला जातो. गोव्यातील बहुतांश गुन्हेगारी प्रकरणांत परप्रांतीयांचा सहभाग दिसतो, असा दावाही त्यांनी केला.

आरजीने या वेळी पुन्हा स्पष्ट केले की, 'पर्सन ऑफ गोवन ओरिजिन' (POGO) विधेयकाला जो पक्ष पाठिंबा देईल, त्याच पक्षाबरोबर आगामी निवडणुकांमध्ये युतीचा विचार केला जाईल. गोव्याची अस्मिता जपणे हे आमचे ध्येय असल्याचे बोरकर यांनी सांगितले.