म्हणाले - 'पोगो'ला पाठिंबा : भाजपला हरवण्यासाठी विरोधकांची एकजूट गरजेची

मडगाव: आरजीच्या ('RG' च्या) 'पोगो' संकल्पनेनुसार 'गोमंतकीय कोण' याची व्याख्या आवश्यक आहे. त्याला आपला पाठिंबा आहे. 'पोगो बिल' (विधेयक), मूळ गोमंतकीयांना राज्यात प्राधान्य व इतर गोष्टी घडायच्या असल्यास सर्वांची एकजूट गरजेची आहे, असे गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले. ते पुढे म्हणाले की, फातोर्डातून तीन निवडणुका जिंकल्या, पण परप्रांतीय व्होटबँकेवर अवलंबून कधी राहिलो नाही. याचा अभ्यास करावा व मनोज परब यांनी आपली चूक सुधारावी, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी 'पोगो'ला पाठिंबा याच अटीवर विरोधकांच्या एकजुटीत सामील झाल्याचे सांगितले असून, यावर आमदार सरदेसाई यांनी सांगितले की, 'पोगो' हा एक विचार 'रिव्हॉल्युशनरी गोवन्स' पक्षाने पुढे आणला आहे. त्यानुसार 'गोमंतकीय कोण' याची एक व्याख्या असावी. त्याचे जाहीरपणे समर्थन केले असून, त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. मनोज परब यांनी केलेल्या मागणीत चुकीचे काहीही नाही. मनोज परब यांच्या मनात जे काही आहे, ते सर्व विरोधक एकत्र आल्यासच शक्य होणार आहे. 'पोगो' हे विधेयक भाजप सरकार सत्तेत असताना कधीही मंजूर होणार नाही. त्यामुळे ते विधेयक संमत करून घेण्यासाठी वेगळे सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे. त्यामुळे एकजूट ही गरजेचीच आहे. तसेच मनोज परब यांनी जी वक्तव्ये केलेली आहेत, त्यात चुकीचे काहीही नाही. 'गोमंतकीय कोण' याची व्याख्या असावी, याचे जाहीर समर्थन आपण केलेले आहे. जो एकजूट दाखवत नाही, तो भाजपला समर्थन करत पुन्हा सत्तेत आणण्याचे काम करत आहे, असेही सरदेसाई म्हणाले.

आम्ही कोणत्याही परप्रांतीय व्होटबँकेवर अवलंबून असलेले नाहीत. मात्र, फातोर्डाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्वांच्या सूचना व हरकती ऐकून घेतल्या जातात. ज्या व्यक्ती परप्रांतातून येऊन गोमंतकीय संस्कृतीचा आदर करत, ती मान्य करतात त्यांनाही घेऊन पुढे जात आहोत. मूळ गोमंतकीयांना राज्यात प्राधान्य मिळावे यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील, त्या करण्याची तयारी आहे व त्यातील एक गोष्ट म्हणजे सर्वांची एकजूट असावी. विरोधक एक होत नाहीत, तोपर्यंत भाजपची सत्ता जाणार नाही, हे सर्व जनतेला माहीत आहे. भाजप सत्तेत राहिल्यास 'पोगो' विधेयकच नाही तर 'गोय गोयकार गोयकारपण' ही टिकणार नाही. गोवा सांभाळून ठेवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले.