
जोधपूर (राजस्थान) : आधुनिक फॅशन इंडस्ट्री (उद्योग) झपाट्याने वाढत असताना, भारतातील पारंपरिक हातमाग क्षेत्रही या बदलांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला सिद्ध करत आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या उद्योगाचे अस्तित्व आव्हानांनंतरही टिकून राहावे, यासाठी जोधपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी (IIHT) संस्थेने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.
आयआयएचटी, जोधपूरचे संचालक डॉ. शिवगणनम के. जे. यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, भारतीय फॅशन इंडस्ट्री वेगाने विस्तारत आहे. या स्पर्धेमध्ये हातमाग क्षेत्राला आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी सज्ज असणे आवश्यक आहे. पारंपरिक क्षेत्राला आयआयएचटीसारख्या संस्थेची साथ असली तरी, आणखी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

१०६२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
१९९३ साली सुरू झालेल्या आयआयएचटी जोधपूरने स्थापनेपासून आतापर्यंत १०६२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. यापैकी अनेक विद्यार्थी वस्त्रोद्योग आणि संबंधित क्षेत्रांत विविध नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत, तर काहींनी उद्योजक बनून स्वतःचे उद्योग सुरू केले आहेत. पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध होत आहेत.

विणकर कुटुंबांसाठी विशेष प्रयत्न
संस्थेचा मुख्य उद्देश हा आहे की सध्याच्या विणकर (हातमाग) कुटुंबांची पुढची पिढीही या व्यवसायात टिकून राहावी. डॉ. शिवगणनम यांनी सांगितले की, संस्थेत विणकर समुदायातील मुलांसाठी २० टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या मुलांमध्ये या क्षेत्राबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी आऊटरीच कार्यक्रम (जागरूकता कार्यक्रम) देखील सुरू करण्यात आले आहेत. जोधपूर शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या आयआयएचटी कॅम्पसमध्ये वसतिगृहाची सुविधा असल्याने देशभरातून विद्यार्थी येथे प्रशिक्षणासाठी येतात.

बाजारपेठेची समज आणि भविष्यातील ट्रेंड
डॉ. शिवगणनम यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, भारतात २८ लाखांहून अधिक विणकर आहेत, परंतु यातील ८५ टक्के विणकर ग्रामीण भागात असल्याने, या असंघटित क्षेत्रापर्यंत पोहोचणे मोठे आव्हान आहे. आयआयएचटीमध्ये देण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये केवळ विणकामाचे प्रशिक्षण नाही, तर विद्यार्थ्यांना बाजारपेठेतील गरजा आणि आवश्यक जोडण्यांची (नेटवर्किंगची) योग्य समजही दिली जाते.
हातमाग क्षेत्र हे फॅशन इंडस्ट्रीचा एक भाग आहे आणि त्यामुळे डिझाइन व रंगसंगतीमधील भविष्यातील ट्रेंडची माहिती ठेवणेही आवश्यक आहे. आज तुम्ही जे विणता, ते आजसाठी नसते; त्या वस्त्राची गरज पुढील सहा महिन्यांच्या ट्रेंडनुसार असते. ही संस्था विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनवण्यासाठी सतत प्रशिक्षण देते.
: डॉ. शिवगणनम के. जे., संचालक, आयआयएचटी जोधपूर.