‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा
पेडणे : मोरजी (Moraji, Goa) वरचा वाडा येथील उमाकांत खोत (Umakant Khot) यांचा जमीन वादातून खून (Murder) झाला असून, याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करा. दिलेल्या तक्रारींची नोंद न घेतलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली.
जमीन विक्री प्रकरणातून खूनप्रकरण घडले असून, याप्रकरणी सखोल तपास करून मुख्य आरोपीला अटक करावी, अशी मागणी आप पक्षातर्फे मांद्रे पोलीस स्थानकात दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे.
यावेळी आप पक्षाचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक, गोवा उपाध्यक्ष सुनील शिंगणापूरकर, मांद्रे आम आदमी महिला अध्यक्ष सुवर्णा हरमलकर, अॅड. प्रसाद शहापूरकर, सचिन घाटोळ, नामदेव तुळसकर, विशाल घाटोळ उपस्थित होते.
वाल्मिकी नाईक यांनी बोलताना सांगितले की, उमाकांत खोत यांनी बेकायदेशीर डोंगर कापणी इतर कामाविषयी सरकारकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारी दरम्यान ‘हिल कटिंग’ चालू असताना त्याचा पंचनामा करताना ५ ऑक्टोबर रोजी उमाकांत खोत तेथे उपस्थित होता. त्यामुळे त्यांचा खून करण्यात आला.
खून करण्याचा उद्देश कुणाचा ?
उमाकांत खोत यांचा खून तिथे काम करणाऱ्या मजुरांचे नसून, त्यांना पकडणे व त्यांच्यावर कारवाई करण्याचे नाटक बंद करावे, असे उमाकांत खोत म्हणाले. यातील खऱ्या सूत्रधारांना अटक करा. याप्रकरणात गुंतलेल्या जमीनदारांची चौकशी होणे गरजेचे आहे.
कामगारांना आणून त्यांच्यावर कारवाई करणे आणि मुख्य संशयितांना मोकळीक देणे, सहन केले जाणार नसल्याचा इशारा वाल्मिकी नाईक यांनी दिला.
अॅड. प्रसाद शहापूरकर,दीपेश नाईक, संजय बोर्डे, सुवर्णा हरमलकर, सुनील शिंगणापूरकर यांनी विविध मुद्दे उपस्थित करून याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली.