खुनाचा संशय : मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार

संशयास्पद मृत्यू झालेल्या परिसराची पाहणी करताना पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता व इतर. (निवृत्ती शिरोडकर)
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : वरचावाडा मोरजी येथील उमाकांत खोत (६४) या वृद्धाचा बुधवारी दुपारी संशयास्पद मृत्यू झाला. जमिनीच्या वादातून बिगर गोमंतकीयांकडून त्यांचा खून झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगून शवचिकित्सा अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे, असे सांगितले. संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा नातेवाईकांनी दिल्याने वातावरण तणावपूर्ण होते.
उमाकांत खोत हे ज्या जमिनीमध्ये कूळ म्हणून होते, ती जमीन जोशी नामक जमीनदाराची आहे. जमीनदाराने अर्धी जमीन दिल्लीवाल्यांना विकली आहे. उमाकांत खोत यांचा जमीन विक्रीला विरोध होता. उमाकांत यांचा जेथे मृत्यू झाला, त्याच्या वरच्या बाजूला जेसीबीद्वारे काम सुरू होते. तेथे प्रशासनाने आणि पंचायतीने परवाना दिल्याचा फलकही लावला होता. उमाकांत जमिनीवर कोसळलेले काही स्थानिकांनी पाहिले आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले. रुग्णवाहिकेतून त्यांना तुये हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू आधीच झाला असल्याचे सांगितले.
उमाकांत खोत शेताची पाहणी करण्यासाठी दुपारी गेले होते. त्यांच्याच जमिनीच्या वरच्या बाजूला जेसीबीद्वारे डोंगर कापणीचे काम सुरू होते. त्याचा जाब विचारण्यासाठी उमाकांत गेले असता, परप्रांतियांनी त्यांना मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बेकायदेशीररीत्या डोंगर कापणीची तक्रार खोत यांनी संबंधित प्रशासनाकडे केली होती, मात्र कारवाई झाली नव्हती, असे खोत यांचे नातेवाईक गावडे यांनी सांगितले. संशयितांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा इशाराही नातेवाईकांनी दिला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.
पोलिसांकडून १४ मजुरांची चौकशी
मांद्रे पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत परिसर सील केेला आणि तपास केला. पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक सलीम शेख, पोलीस निरीक्षक गीरेंद्र नाईक आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथील १४ मजुुरांची चौकशी केली. तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शवचिकित्सा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे, असे सांगितले.