भरधाव टँकरची कारला धडक, कारचा चक्काचूर : मृतांत ऑल इंडिया सेपक टाक्रॉ असोसिएशनचे अध्यक्ष, खेळाडूचा समावेश

अपघातात चक्काचूर झालेली कार. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : पणजी ते मडगाव राष्ट्रीय महामार्गावरील बांबोळी येथे नियाझ रेस्टॉरंटजवळील उतरणीवर सोमवारी मध्यरात्री टँकर आणि ‘रेंट अ कॅब’चा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला, तर टँकर रस्त्याशेजारील खड्ड्यात पडला. कारमधील सेपक टाक्रॉ असोसिएशनचे अध्यक्ष योगेंद्र सिंग व खेळाडू अंकित कुमार बलियान या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जुने गोवा पोलिसांनी टँकरचालक राहुल सरवदे याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री १२.४५ दरम्यान बांबोळी येथे नियाझ रेस्टॉरंटजवळील उतरणीवर अपघात झाला. टँकर बांबोळीहून पणजीच्या दिशेने जात होता, तर ‘रेंट अ कॅब’ पणजीहून मडगावच्या दिशेने जात होती. वरील ठिकाणी उतरणीवर पोहोचताच टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. टँकरची धडक प्रथम दुभाजकाला बसली. दुभाजकावरून ओलांडून विरुद्ध बाजूने येत असलेल्या ‘रेंट अ कॅब’ कारला टँकरने धडक दिली. नंतर टँकर रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला. भरधाव वेगात असलेल्या टँकरची धडक इतकी भीषण होती की, या अपघातात कारचा चक्काचूर झाला. टँकरचेही मोठे नुकसान झाले. टँकरच्या धडकेने दुभाजकावरील विजेचा खांबही कोसळला.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १ च्या सुमारास वरील अपघाताची, तसेच कारमध्ये दोघे अडकून पडल्याची माहिती दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. ही माहिती कक्षाने पणजी अग्निशमन दलाला दिली. पणजी अग्निशमन स्थानकाचे अधिकारी रूपेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लिडिंग फायर फायटर किशोर गावस, चालक ऑपरेटर नितीन शिरोडकर, फायर फायटर दीप्तेश पै, गुरु कुडणेकर, नारायण नार्वेकर व लक्ष्मण कोडगीणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
कारमधून दोघांना काढण्यासाठी मागवली अतिरिक्त मदत
अग्निशामक दलाच्या जवानांनी कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कारचा चक्काचूर झाल्याने त्यातून दोघांना बाहेर काढणे त्यांना कठीण होऊ लागले. त्यांनी परिस्थितीची सविस्तर माहिती देऊन अतिरिक्त मदत मागवली. त्यानुसार मुख्यालयाचे लिडिंग फायर फायटर यशवंत कोल्हापूरकर, चालक ऑपरेटर दामोदर राव, फायर फायटर संजय मळीक, बाबूराव आरोंदेकर, अश्वेत नाईक आणि दीपक नाईक घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पथकाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून कारमधून दोघांना बाहेर काढले. मात्र कारमधील दोघांचाही मृत्यू झाल्याचे दिसून आले. दोघांचेही मृतदेह गोमेकाॅच्या शवागारात पाठवण्यात आले.

पोलिसांकडून पंचनामा, टँकर चालकाला अटक
अपघाताची माहिती मिळताच जुने गोवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चतुर सावंत यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला. महिला उपनिरीक्षक जस्वीता नाईक यांनी टँकर चालक राहुल सरवदे याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. अपघातात ठार झालेले योगेंद्र सिंग आणि अंकित कुमार यांच्या मृतदेहांची शवचिकित्सा झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.