अॅप डाऊनलोड करण्यास सांगून घातला ४९.४२ लाखांचा गंडा

सायबर विभागाकडून तपास सुरू


8 hours ago
अॅप डाऊनलोड करण्यास सांगून घातला ४९.४२ लाखांचा गंडा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : शेअर ट्रेडिंगचे अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून मुरगाव तालुक्यातील ४३ वर्षीय व्यक्तीला ४९.४२ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी गोवा पोलिसाच्या सायबर विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईल धारकांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दाबोळी येथील ४३ वर्षीय व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २० आॅगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ९६३५२२०२८७ आणि ८६७०३८८०३६ या मोबाईलधारकांनी संपर्क साधून ते परवानाधारक शेअर ब्रोकर असल्याचे भासवले. वरील मोबाईलधारकांनी तक्रारदाराला ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर विभागात तक्रार दाखल केली. सायबर विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईल धारकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) आरडब्ल्यू ३(५) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ‘डी’ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अशी झाली फसवणूक...
तक्रारदाराला ‘व्हीआयपी-६१ फॉर्च्युन सेंटर’ या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले.
त्याला १२ ते २२ ऑक्टोबर दरम्यान ‘टेन काेअर आयएनव्ही’ हे अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले.
जादा परताव्याचे आमिष दाखवून अॅपद्वारे गुंतवणूक करण्यास सांगितले.
तक्रारदाराने आयसीआयसीआय आणि आयडीएफसी बँक खात्यांतून सुमारे ४९.४२ लाख रुपये अॅपद्वारे गुंतवले.

काही दिवसांनंतर त्याचे अॅपवरील खाते बंद झाले.