प्रदेशाध्यक्षांकडून स्पष्ट : अनेक जण इच्छुक असल्याने बिनविरोध निवड अशक्य

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : फोंडा पोटनिवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. माजी मंत्री रवी नाईक यांचा वारसा पुढे नेण्याची घोषणा त्यांचे सुपुत्र रितेश नाईक यांनी केली आहे. भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा असली तरी अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्वच घेणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले.
रितेश नाईक यांनी सांगितले की, मी मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. भाजप, काँग्रेस आणि मगो या तिन्ही पक्षांतून इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. त्यामुळे फोंड्याची पोटनिवडणूक बिनविरोध होणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारीसाठी रितेश नाईक यांच्यासोबतच इतर काही इच्छुकांची नावेही चर्चेत आहेत. मात्र उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे दामू नाईक यांनी सांगितले.
फोंडा पोटनिवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. भाजप फोंडा विभागीय समिती आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संभाव्य उमेदवारांची नावे ठरवण्यात येतील. ती नावे केंद्रीय समितीकडे पाठवली जातील. केंद्रीय नेतृत्व राज्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून उमेदवार निश्चित करेल. ही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी घाई करणे अयोग्य आहे. उमेदवार निवड प्रक्रिया ठरलेल्या पद्धतीनेच होणार आहे. एकंदर कार्यपद्धती, जनसंपर्क आणि संघटनात्मक ताकद लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल.