सिद्दण्णा मेट्टी : सांकवाळ येथे कर्नाटक राज्योत्सव दिन

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : आम्हाला घाटी म्हणू नका. गोव्यात आमची काही मतदारसंघांत २ हजार ते १० हजार मते आहेत. आम्हाला पाठिंबा द्या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. उत्तर भारतीयांनी जमिनी खरेदी करून गोव्याचा नाश केला असताना, तुम्ही फक्त आमच्यासारख्या गरिबांनाच का लक्ष्य करता, असा सवाल अखिल गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिद्दण्णा मेट्टी यांनी 'रिव्होल्युशनरी गोवन्स'ला (आरजी) उद्देशून केला..                   
कन्नड राज्योत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सांकवाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला बसनगौडा पाटील यत्नाल उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर सिद्दण्णा मेट्टी यांनी गोव्यात काहीजण आम्हाला  ‘घाटी’ म्हणून हिणवत असल्याबद्दल राग व्यक्त केला. मेट्टी यांनी यापूर्वी मुरगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी प्रचारासाठी माजी पंतप्रधान देवेगौडा यांना बायणामध्ये आणले होते. सिद्दण्णा यांचे भाऊ शरण मेट्टी हे सांकवाळचे सरपंच होते.  मेट्टी यांचे गेल्या काही वर्षांपासून  समाजकारण, राजकारण सुरू झाले आहे. आता तर त्यांनी कुठ्ठाळी मतदारसंघात स्थलांतरितांची लोकसंख्या मोठी असल्याने तेथे कन्नड भाषिक उमेदवाराचा विचार करावा, असे आवाहन केले आहे.  आम्हाला ‘घाटी’ म्हणणाऱ्यांनी  कन्नड भाषिक समाजाने गोव्यासाठी दिलेले योगदान व आमच्या शक्तीची दखल घेण्याची गरज आहे, असेही मेट्टी म्हणाले.
एखादा बिगरगोमंतकीय सरपंच म्हणून निवडून आल्यास त्याचा सत्कार करण्याची गरज आहे. त्याला ‘घाटी’ म्हणून हिणवू नये. शेवटी आपण भावांसारखे आहोत. आगाभी जिल्हा पंचायत  व विधानसभा निवडणुकीत आम्ही जिल्हा पंचायत सदस्य व  आमदारही  निवडून आणू. त्यासाठी तुमचा पाठिंबा पाहिजे. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला मदत करू. गोव्यातील प्रत्येक मतदारसंघात दखल घेण्याइतके आमचे मतदार आहेत.  भाजी, फुले, मासे व इतर किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांना लक्ष्य करू नका, असे आवाहन मेट्टी यांनी आरजीवाल्यांना केले.
जमीन खरेदी करणाऱ्या उत्तर भारतीयांना रोखा !
उत्तर भारतीयांनी गोव्यात येऊन मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. झुआरीनगर  येथे एक ते दोन लाख रुपये प्रतिचौरस मीटर या दराने जमिनी विकल्या जात आहेत. त्यांना रोखा, आम्ही तुमचे उपकार विसणार नाही, असे मेट्टी यांनी सांगितले.  ‘आरजी, आरजी’चे काय सांगता ? संविधान नाही का ? संविधानामुळे आम्ही  आमदार, मंत्री, खासदार, मुख्यमंत्री निवडू शकतो, हे लक्षात ठेवा, असेही मेट्टी यावेळी म्हणाले.