कार्तिक महिन्यातील उत्सव आणि त्रिपुरारी पौर्णिमा

गोव्यात त्रिपुरारी पौर्णिमेला दीपमाळ प्रज्वलित केल्यानंतर गावोगावी जत्रा, कालो यांचा मोसम सुरू होतो. संकासुर काला, रातकाला, गवळणकाला, दशावतारी लोकनाट्ये आदींच्या सादरीकरणातून कार्तिक महिन्यातील आणि नंतरचे दिवस मंतरलेले होतात.

Story: विचारचक्र |
3 hours ago
कार्तिक महिन्यातील उत्सव आणि त्रिपुरारी पौर्णिमा

दिवाळी हा दिव्यांचा सण. आश्विन महिना निरोप घेताना आणि कार्तिक महिन्याचा प्रारंभ होण्याच्या कालखंडात येत असला तरी शरद ऋतूतील रात्री तेजोमय करताना हा सण त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत साजरा होत असतो. पृथ्वीतलावर त्याचप्रमाणे देवादिकांना हैराण करणाऱ्या त्रिपुरासुराचा अंत भगवान शंकराने केला आणि त्यासाठी हा सण दिवे प्रज्वलित करून साजरा करण्याची परंपरा गोव्यात आहे.

कार्तिक महिन्यातील एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपुराला श्रीविठ्ठलाच्या जत्रेत सहभागी होण्यासाठी भाविक उपस्थित रहातात आणि ज्यांना तेथे जाणे शक्य नसते, ते हा पर्वदिन घरी साजरा करतात. आषाढातील एकादशीला श्रीविष्णू चार महिन्यांच्या काळासाठी निद्राधिन होतो आणि कार्तिकातील एकादशीला तो जागृत होतो आणि त्यासाठी ही मान्सूनचा पाऊस निरोप घेतेवेळी येणारी एकादशी प्रबोधिनी म्हणून साजरी केली जाते.

कार्तिकातील या पौर्णिमेला गोवा, कोकणातील भातशेत जमिनीतील पैदासी झालेल्या अन्नधान्यांचे दाणेगोटे घरात आलेले असल्याने जुन्या काळी त्याला आनंदाची पर्वणी लाभलेली असायची. आपल्याला जी सुखसमृद्धी लाभलेली आहे त्यामागे ईश्वरी कृपा, आशीर्वाद लाभलेला असल्याची भावना लोकमानसात रूढ असल्याने त्याविषयीची कृतज्ञता आणि आनंद अभिव्यक्त करण्यासाठी दिवे लावले जातात. श्रीविष्णू चार महिन्यांच्या प्रदीर्घ काळाच्या निद्रेतून जागा होत असल्याने तो दिवस देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो.

गोव्यात कार्तिक एकादशी विशेषतः गोडधोड भोजन आणि मोसमी कंदमुळे सेवन करून साजरी केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून दारात असलेल्या तुळशी वृंदावनाचा विवाह दिणोरूपी श्रीविष्णूशी लावला जातो. तुळशी विवाहाचा हा सोहळा कार्तिक पौर्णिमेपर्यंत उत्साहाने साजरा केला जातो. तुळशी विवाह समाप्ती झाल्यानंतर गोव्यातील हिंदू धर्मियांत लग्न सराई सुरू होते आणि त्यामुळे मान्सूनच्या पावसानंतर संपन्न होणाऱ्या या प्रातिनिधिक विवाहाची प्रतिक्षा असते.

आदिवासी बहुल अशा धारबांदोडा येथील ओकामी आणि साकोर्डा येथील उधळशेला कार्तिक द्वादशीपासून कातयांच्या चार रात्रीच्या पारंपरिक गायन आणि नर्तनाने युक्त उत्सवाला सुरुवात होते. पहिल्या रात्री तुळशी वृंदावनाला फुलांनी सजवले जाते आणि तांदळाच्या पिठाने खास नखांच्या आकाराने रांगोळी घातली जाते आणि त्यानंतर परंपरेने चालत आलेल्या लोकगीतांचे गायन करत नृत्याचा आविष्कार घडवला जातो. शेवटच्या रात्रीला आकाशात कार्तिकातील पूर्ण चंद्र क्षितिजावर उगवलेला असतो आणि त्याचवेळेला कृतिका म्हणजे सात नक्षत्रांचा पुंजका दृष्टीस पडत असतो. त्यासाठी चंद्रासमवेत कृतिका नक्षत्रांसह चित्रण रांगोळीत केले जाते. लोकनृत्यांत सहभागी तरुणी आणि महिलांच्या त्यामुळे उत्साहाला उधाण येते आणि तन्मयतेने त्या समरस होतात.

पौर्णिमेचा आल्हादायी चंद्रप्रकाश जेव्हा पडतो, तेव्हा त्यांच्या नृत्य-गायनाला आगळावेगळा आयाम लाभतो. आपल्या अन्नधान्यांचे रक्षण व्हावे आणि एकंदर जगणे समृद्ध व्हावे, ही अभिलाषा बाळगून कात्याच्या उत्सवाची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते. काणकोण तालुक्यात स्थानिक मंदिरासमोर जो ओटम वृक्षाचा खांब उभा केलेला असतो, त्याचे आत्मीयतेने पूजन केले जाते.

वांते - सत्तरी येथे बारामाही सुजलाम तळ्याच्या सान्निध्यात असणाऱ्या श्री गणपती दतात्रय मंदिरात आणि जलाशयाला प्रज्वलित करणारे असंख्य दिवे लावले जातात. प्रज्वलित होणाऱ्या दिव्यांच्या विलोभनीय प्रकाशाने जलाशय उजळून निघतो. कुळागरांच्या कुशीत वसलेल्या परिसरातील ही त्रिपुरारी पौर्णिमा भाविकांना अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची जणुकाही प्रेरणा देत असते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या या उत्सवाला हा जलाशय जसा तेजोमय होतो, तसाच भाविकांच्या उपस्थितीत भक्तीची पर्वणी ठरतो. कारापूरचा विठ्ठलापूर आणि साखळी शहर यांच्या मधोमध वाहणारी वाळवंटी नदी त्रिपुरारी पौर्णिमेच्या नौकानयन आणि धार्मिक, सांस्कृतिक सोहळ्यांनी अक्षरशः गजबजते. श्री विठ्ठलाच्या सान्निध्यात संपन्न होणारा हा उत्सव गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांसाठी आकर्षण ठरू लागलेला आहे.

कार्तिकी एकादशीपासून मडगाव येथील श्री विठ्ठल मंदिर दिंडी महोत्सवामुळे भक्तीरसात न्हाऊन निघते. मानवी जीवनात भगवद् भक्तीचा सत्संग आपल्याला सांसारिक व्यापातापांना सामोरे जाताना भवसागर ओलांडण्यासाठी सहाय्य करते आणि त्यासाठी भजन, कीर्तन, दिंडी आदी माध्यमातून दामबाब म्हणजे श्रीदामोदर भूमीतील भाविक विठ्ठल भक्तीशी एकरूप होतात. काणकोणात तामणे - लोलये येथे श्री चांमुंडेश्वरी कुडतरकरीण देवस्थान असून, येथे संपन्न होणारा पागी समाजाशी निगडित दिवजोत्सव गोवाभर प्रसिद्ध आहे. पोर्तुगीज अमदानीत धार्मिक छळवणुकीने सासष्टीतील कुडतरीत जेव्हा उच्चांक गाठला, तेव्हा भाविक पाड्डे - केपेहून पेटत्या पणत्यांसह देवदर्शनास जात असताना, पणती मालवली म्हणून तेथे उपलब्ध निवडुंगाच्या पोकळ दांड्यांत आपली दहाही बोटं घालून त्यात कापसाची वात आणि तेल घालून दिवजे पेटवली आणि तेव्हापासून कार्तिकी द्वादशीला सुवासिनी निवडुंगाच्या (निवलकाणी) दांड्यांचा आणि त्यांचे पती केळीच्या गब्यात तेल, वात घालून दिवजे प्रज्वलित करून देवीची ओवाळणी करतात. 

गोव्यातील दिवजोत्सवाची ही अनोखी परंपरा तामणेत अनुभवायल मिळते. गोव्यात त्रिपुरारी पौर्णिमेला दीपमाळ प्रज्वलित केल्यानंतर गावोगावी जत्रा, कालो यांचा मोसम सुरू होतो. संकासुर काला, रातकाला, गवळणकाला, दशावतारी लोकनाट्ये आदींच्या सादरीकरणातून कार्तिक महिन्यातील आणि नंतरचे दिवस मंतरलेले होतात.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५