गोवेकरांचा स्वाभिमान दुखवू नका

राजकारणी तुमचे चोचले पुरवत असतील, पण गोवेकरांचा स्वाभिमान दुखवण्याचा प्रयत्न केल्यास, तुम्हाला गोवेकर म्हणून स्वीकारण्यासाठी पुढील दशकेही शक्य होणार नाही. आपल्या मतांवर लोक जिंकतात, असा कोणीही माज करू नये.

Story: संपादकीय |
3 hours ago
गोवेकरांचा स्वाभिमान दुखवू नका

सध्या सरकारची 'माझे घर' योजना सुसाट चालली आहे. परप्रांतीयांना जमिनी आंदण देण्यासाठी सरकारचे खटाटोप सुरू आहेत, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. या वादात अखिल गोवा कन्नड महासंघाने विनाकारण उडी घेतली. या संघटनेचे नेते सिद्दण्णा मेटी यांनी गोव्यातील परप्रांतीय आणि मूळ गोंयकार यांच्यातील वाद पुन्हा उकरून काढला. यावेळी त्यांनी गोमंतकीयांना सावध व्हावे अशीच विधाने केली आहेत. मेटी यांचा गोव्यातील कन्नड मतदारांवर चांगला प्रभाव आहे, हे गेल्या काही निवडणुकांमधूनही दिसून आले. काही राजकीय नेते मेटींसह काही कन्नड नेत्यांना निवडणुकीच्या काळात कन्नड मतदारांना प्रभावित करण्यासाठी बोलावतात. त्यांच्याकडून भाषणे करून घेतात. सध्याच्या सरकारमध्येही काही आमदार आहेत, ज्यांनी कन्नड नेत्यांची मदत घेतली आहे. विशेषतः सत्ताधारी गटातील आमदारांनी सिद्दण्णा मेटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मदत घेतलेली आहे. त्यामुळे मेटी काहीही बोलले तरी राजकीय नेते त्यांच्या वाटेला जात नाहीत. रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे नेते मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांनी मात्र मेटी यांना प्रत्युत्तर दिले. मेटी यांच्या विधानानंतर त्यांना गोव्यातील लोकांकडूनही तसे प्रत्युत्तर मिळाले. हा विषय उकरून काढल्यामुळे नव्हे, तर गोमंतकीय नेते आपल्या मतांवर जिंकतात असे दाखवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या मेटी यांना पश्चातापही व्हायला हवा. एव्हाना त्यांना पश्चाताप झाला असेलही.

त्यांना पश्चाताप होईलच याची खात्री नाही. गोव्यात राहून त्यांनी आपली मक्तेदारी सिद्ध केली आहे. त्यांनाही माहीत आहे, इथे राजकीय नेत्यांचे आपल्या मतांशिवाय पान हलणार नाही. त्यामुळे कोणताच राजकीय नेता आपल्याला काही म्हणणार नाही. मेटी यांनी थेट आमच्या मतांवर लोक निवडून येत आहेत आणि आम्ही पुढे जिल्हा पंचायत सदस्य, आमदारही निवडून आणू असे म्हणत रिव्हॉल्यूशनरी गोवन्सच्या नेत्यांचा पाठिंबा मागितला आहे. त्या बदल्यात आपला पाठिंबा तुम्हाला देऊ, असे त्यांनी सांगितले आहे. मेटी यांनी तर अनेक मतदारसंघांत आपली २ ते १० हजार इतकी मतेही आहेत, असे बोलून दाखवले. आमचे सरपंच वगैर निवडून येत आहेत, त्यांना स्वीकारून त्यांचा सत्कार करण्याचे आवाहनही ते करतात. यावरून मेटी यांचा वाढलेला आत्मविश्वास दिसतो.

मेटी यांनी 'आम्ही आता गोव्यातलेच झालो आहोत. चार-पाच दशके इथे असल्यामुळे भारतीय संस्कृती पुढे नेत आहोत,' असाही दावा केला. मेटी यांनी कन्नड लोक गोव्यात कसे रुळले आहेत, हे सांगताना गोव्यातील राजकारणात आता कन्नड मतदारांचा कसा प्रभाव आहे आणि त्यांची राजकारण्यांना कशी मदत होते तसेच रिव्हॉल्यूशनरी गोवन्सने पाठिंबा दिला तर त्यांनाही कसा आपला पाठिंबा कसा मिळू शकतो, ते सांगण्याचा प्रयत्न करताना कन्नड मतदारांचा गोव्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव असल्याचे अधोरेखित केले आहे. त्यामुळेच आपल्याला 'घाटी' म्हणून हिणवण्याचे थांबवा असे आवाहन ते करतात. त्यांच्या या दाव्यामुळे निश्चितच त्यांना 'घाटी' म्हणणाऱ्यांवर थोडा परिणाम होईलही. पण कन्नड मतदारांशिवाय इथल्या काही राजकारण्यांचे पान हलत नाही, हा त्यांनी अप्रत्यक्षपणे केलेला दावाही उघड झाला आहे. परप्रांतीयांनी गोव्यात सरकारी, कोमुनिदादच्या जमिनी बळकावल्या, त्यांना आता 'माझे घर' योजनेतून कायदेशीर स्वरूप प्राप्त होणार आहे, कदाचित त्या आनंदाच्या भरात मेटी यांनी आम्ही आता इथलेच, आम्हाला 'घाटी' म्हणू नका म्हणून आवाहन करत असतील. 'घाटी' म्हटले म्हणून कोणताही भेदभाव होत नाही. 'घाटी' असल्याचाही अभिमान वाटायला हवा. घाटावरून येऊन गोव्यातील सगळी कामे करणाऱ्या परप्रांतीयांना भलेही 'घाटी' शब्द ऐकून वाईट वाटत असेल, पण गोव्याची अस्मिता न स्वीकारता जर कोणी 'आपण कन्नड', 'आपण भोजपुरी' म्हणून वेगळे असण्याचे पुरावे देत असतील, तर हे शब्द त्यांना चिकटूनच राहतील. हे चित्र बदलण्यासाठी गोव्यात राहत असाल तर गोव्याची संस्कृती, गोव्याच्या भाषा, गोव्याची अस्मिता स्वीकारावी लागेल. तसे न करता इथल्या राजकारण्यांना मतांचा धाक दाखवत असाल तर काही लोक तुम्हाला शेवटपर्यंत 'घाटी'च म्हणतील. त्यासाठी तुम्ही गोवेकरांवर उपकार करत आहात, अशी भावना करून घेऊ नका. राजकारणी तुमचे चोचले पुरवत असतील, पण गोवेकरांचा स्वाभिमान दुखवण्याचा प्रयत्न केल्यास, तुम्हाला गोवेकर म्हणून स्वीकारण्यासाठी पुढील दशकेही शक्य होणार नाही. आपल्या मतांवर लोक जिंकतात, असा कोणीही माज करू नये. गोव्यात राहत असाल तर आम्ही गोवेकर आहोत, आमच्या पिढ्या गोव्यातच पोसल्या आहेत आणि पोसल्या जातील यासाठी प्रयत्न करा. इथल्या मूळ गोवेकरांना दुखवण्याचे प्रयत्न करू नका. त्यातून तुम्हालाच हिणवण्याचे प्रयत्न होतील.