गिझाच्या जगातील सर्वात मोठे संग्रहालय खुले

Story: विश्वरंग |
3 hours ago
गिझाच्या जगातील सर्वात मोठे संग्रहालय खुले

इजिप्तमधील गिझाच्या प्रसिद्ध पिरॅमिडजवळ जगातील सर्वात मोठे संग्रहालय, ग्रँड इजिप्शियन म्युझियम (जीईएम), अखेर जनतेसाठी खुले झाले आहे. १ अब्ज डॉलरहून अधिक खर्चून साकारलेले हे भव्य संग्रहालय इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या उपस्थितीत जगातील नेत्यांसह शनिवारी खुले झाले. इजिप्तच्या पर्यटन उद्योगासाठी हे एक मोठे पाऊल मानले जात असून, दरवर्षी ८० लाख पर्यटक येथे भेट देण्याची अपेक्षा आहे.

या संग्रहालयाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे बाल राजा तुतानखामुनची कबर. १९२२ मध्ये ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ हॉवर्ड कार्टर यांनी शोधलेल्या या ३,००० वर्ष जुन्या कबरीतील ५,५०० हून अधिक कलाकृती आता प्रथमच एकाच ठिकाणी प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. या संग्रहालयात ८३ टन वजनाची ३,२०० वर्षे जुनी रामेसेस-२ ची मूर्ती आणि ४,५०० वर्षे जुनी खुफूची बोट यासह ५० हजारांहून अधिक ऐतिहासिक वस्तूंचा समावेश आहे.

तुतानखामुनच्या थडग्याशी जोडलेले गूढ आजही चर्चेत आहे. २६ नोव्हेंबर १९२२ रोजी थडगे उघडले. 'राजाची झोप मोडणाऱ्याला मृत्यू येईल' अशी अफवा स्थानिक कामगारांमध्ये पसरली होती. थडगे शोधणारे लॉर्ड कार्नार्वन यांचा पाच महिन्यांत रहस्यमय मृत्यू झाला आणि त्यानंतर आर्चीबाल्ड डग्लस रीड, ह्यू एव्हलिन व्हाईट, आर्थर मॅचेन्थ आणि सर ली ब्रूस यांसारख्या उत्खननात सहभागी असलेल्या आणखी चार जणांचाही गूढरित्या मृत्यू झाला. या 'तुतानखामुनच्या शाप'ची फाइल आजही बंद नाही. तथापि, नवीन डीएनए आणि फॉरेन्सिक अहवालातून हे मृत्यू योगायोगाने आणि थडग्याच्या भिंतींवर आढळलेल्या जीवाणू आणि बुरशीमुळे झाले असावेत, ज्यांनी कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांच्या फुफ्फुसांना नुकसान पोहोचवले, असा दावा केला जात आहे.

ग्रँड इजिप्शियन म्युझियम हे ४ लाख ७० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरले असून त्यात आधुनिक सुरक्षा व्यवस्था आहे, परंतु अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

- सचिन दळवी