‘पोगो’ विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या पक्षाबरोबरच आरजी करणार युती!

मनोज परब यांची स्पष्टोक्ती : व्यवसाय, रोजगारासाठी आलेल्यांकडून वर्चस्वाचा प्रयत्न

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
‘पोगो’ विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या पक्षाबरोबरच आरजी करणार युती!

पणजी : गोव्यात रोजगाराच्या निमित्ताने आलेले काही परप्रांतीय आज येथे मालक बनले आहेत. जसे पोर्तुगीज व्यवसायाच्या नावाखाली आले आणि शेवटी गोवा काबीज केला, त्याचप्रमाणे काही कन्नडीग आता गोव्याच्या व्यवसायात घुसखोरी करून राज्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. गोमंतकीय जनतेने याबाबत जागृत व्हावे, असे आवाहन रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे (Revolutionary Goans Party) अध्यक्ष मनोज परब (Manoj Parab) यांनी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, ‘पोगो’ विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या पक्षाबरोबरच आरजी युती करणार असल्याचे त्यांनी​ स्पष्ट केले.
परब म्हणाले, राज्यातील काही आमदारांनी वोटबँक तयार करण्यासाठी या परप्रांतीयांच्या वस्त्या निर्माण केल्या. आज हेच लोक पंच, सरपंच बनले आहेत आणि लवकरच ते आमदार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जो पक्ष ‘पोगो’ (पर्सन ऑफ गोवन ओरिजीन) (Person of Goan origin) विधेयकाला पाठिंबा देईल, त्याच पक्षाबरोबर आरजी आगामी जिल्हा परिषद आणि २०२७च्या विधानसभा निवडणुकांमध्ये युतीचा विचार करेल. फक्त भाजपला पराभूत करणे हा आमचा उद्देश नाही, तर गोव्याची अस्मिता जपणे हे आमचे ध्येय आहे.
राज्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या परप्रांतीयांविषयी ‘घाटी’ हा शब्द वापरला जात नाही, तर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविषयीच तो शब्दप्रयोग केला जातो, असे परब यांनी स्पष्ट केले. गोव्यातील बहुतांश गुन्हेगारी प्रकरणांत परप्रांतीयांचा सहभाग दिसतो. काही राजकारणी त्यांना केवळ राजकीय फायद्यासाठी डोक्यावर घेत आहेत आणि आता हेच लोक आमदार, मंत्री, मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहत आहेत. गोवेकरांसारखे कपडे घातले म्हणून कोणी गोवेकर होत नाही, असे परब म्हणाले.

म्हादईच्या विषयावर मेटींना प्रश्न
कन्नड नेते सिद्दण्णा मेटी (Siddanna Metty) यांनी म्हादई नदीविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी परब यांनी केली. जर ते स्वतःला गोवेकर म्हणतात, तर गोव्याच्या जीवनदायिनी म्हादई नदीच्या विषयावर त्यांनी कर्नाटक सरकारला जाब विचारला पाहिजे, असे ते म्हणाले.

परप्रांतीयांकडून भविष्यात धोका : बोरकर
आरजीचे नेते आणि आमदार वीरेश बोरकर (Viresh Borkar) म्हणाले, भाजप सरकारकडून परप्रांतीयांचे लाड चालू राहिले, तर पुढील पाच ते दहा वर्षांत गोव्याच्या ४० आमदारांपैकी अनेक आमदार परप्रांतीय असतील. याचे पहिले संकेत मेटी यांच्या वक्तव्यातूनच मिळत आहेत. गोव्यात रोजगार, व्यवसायाच्या संधी कमी झाल्याने गोवेकर तरुण परराज्यात किंवा परदेशात जात आहेत, तर परप्रांतीय येथे स्थायिक होत गोव्याची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. गोव्याची अस्मिता आणि ओळख जपण्यासाठीच रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष स्थापन केला आहे.