नोव्हेंबरच्या प्रारंभीच राज्यात रेंट-अ-कारचे तीन अपघात

दहा महिन्यांत एकूण ३५ अपघात; सर्वाधिक हणजूण पोलीस स्थानकाच्या हद्दीत


2 hours ago
नोव्हेंबरच्या प्रारंभीच राज्यात रेंट-अ-कारचे तीन अपघात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच गोव्यात ‘रेंट-अ-कार’ वाहनांचे अपघात वाढले आहेत. फक्त चार दिवसांत तीन अपघातांची नोंद झाली आहे.
वाहतूक संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या दहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात ‘रेंट-अ-कार’शी संबंधित ३५ किरकोळ व गंभीर अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १३ अपघात हणजूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत, त्यानंतर कळंगुट व साळगाव हद्दीत प्रत्येकी ५, वर्णा येथे ४, मांद्रे येथे ३, तर जुने गोवे आणि मुरगाव हद्दीत प्रत्येकी १ अपघात नोंदवला गेला.
एप्रिल, मे आणि जून महिन्यांत अपघातांची वारंवारता सर्वाधिक होती. जून महिन्यात सर्वाधिक ८ अपघात, तर मे महिन्यात ७, आणि एप्रिलमध्ये ६ अपघात झाले. जुलै आणि सप्टेंबर महिन्यांत मात्र एकही अपघात झाला नाही. ऑक्टोबरपासून पुन्हा अपघातांची मालिका सुरू झाली.
राज्यात महिनानिहाय रेंट अ कारचे झालेले अपघात
जानेवारी – २
फेब्रुवारी – ४
मार्च – १
एप्रिल – ६
मे – ७
जून – ८
जुलै – ०
ऑगस्ट – १
सप्टेंबर – ०
ऑक्टोबर – ३
नोव्हेंबर (१ ते ४ तारीखपर्यंत) – ३
नोव्हेंबरच्या चार दिवसांत घडलेले अपघात
१ नोव्हेंबर : हणजूण परिसरात दोन रेंट-अ-कार गाड्यांची समोरासमोर धडक.
२ नोव्हेंबर : रेंट-अ-कार दुसऱ्या वाहनावर जाऊन आदळली; दोघे गंभीर जखमी.
४ नोव्हेंबर : बांबोळी महामार्गावर टँकरची रेंट-अ-कारला धडक. सेपक टॉक्राचे अध्यक्ष आणि खेळाडूचा जागीच मृत्यू.
वाहतूक नियमांचे पालन आवश्यक
वाहतूक खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पर्यटन हंगाम सुरू होताच ‘रेंट-अ-कार’चा वापर वाढतो. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन आणि पर्यटकांच्या ड्रायव्हिंग परवान्यांची काटेकोर तपासणी आवश्यक आहे.”

राज्यात १० महिन्यांत २१३ जणांचा अपघातांत मृत्यू

राज्यात १ जानेवारी ते ३ नोव्हेंबर या दहा महिन्यांत १,९४२ अपघातांत २१३ जणांचा मृत्यू झाला.
२१३ पैकी २३ मृत्यू हे राष्ट्रीय महामार्गावरील पणजी ते आगशीपर्यंतच्या पट्ट्यात झाले.
आकडेवारीवरून महिन्याला राज्यात २०, तर वरील पट्ट्यात दोघांचे अपघाती मृत्यू होत आहेत.
वरील पट्ट्यात शिरदोन येथे उतरणीवर २१ ऑक्टोबर रोजी पहाटे स्वयंअपघात झाला होता. त्यात हरिगोविंद पी. (२२, कोलम-केरळ) आणि विष्णू जयप्रकाश (२१, कन्नूर-केरळ) हे अग्न‌िवीर नौदल कॅडेट युवक ठार झाले होते.
वरील कालावधीत २०६ भीषण अपघातांत २१३ जणांचा मृत्यू झाला. वरील कालावधीत २०२४ च्या तुलनेत २६६ (१२.०४ टक्के) अपघात आणि २९ अपघाती मृत्यू (११.९८ टक्के) कमी झाले.
महिन्याला सरासरी १९४ अपघात होत आहेत.
राज्यात वरील कालावधीत २४५ जण गंभीर जखमी झाले.
३५० अपघातांत ५६६ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
१,१९३ अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
१ जानेवारी ते ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीतील आकडेवारी
राज्यात २,२०८ अपघात झाले.
२३० भीषण अपघातांत २४२ जणांचा बळी गेला.
१५२ अपघातांत २१७ जणांना गंभीर, तर ४०८ अपघातांत ६५० जणांना किरकोळ दुखापती झाल्या.
१,४१३ वाहनांचे मोठे नुकसान झाले.
२०२५ मध्ये २०२४ च्या तुलनेत २६६ अपघात, तर २९ अपघाती मृत्यू कमी झाले.