केंद्राचा अहवाल : २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये २६६ अपघात कमी

गोवन वार्ता
पणजी : गोव्याने रस्ते अपघात कमी करण्याच्याबाबतीत सकारात्मक कामगिरी दर्शवली आहे. देशातील पाच लहान राज्यांपैकी एक म्हणून गोव्याने अपघातांमध्ये घट नोंदवली आहे. ही माहिती केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वाहतूक संशोधन विभागातर्फे जाहीर करण्यात आली.
मंत्रालयाने देशभरातील पोलीस स्थानकांकडून रस्ते अपघातांच्या आकडेवारीचा अभ्यास करून २०२३ चा अहवाल तयार केला. त्यात २०२४ मधील अंदाजित तुलनात्मक आकडेही समाविष्ट केले आहेत. दोन वर्षांचा तुलना-अभ्यास केल्यानंतर देशातील नऊ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये रस्ते अपघातांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे संकेत सकारात्मक मानले जात आहेत.
अपघातांमध्ये घट नोंदवणाऱ्या लहान राज्यांमध्ये गोव्याचा क्रमांक पहिल्या पाचमध्ये आहे. गोव्याबरोबरच हिमाचल प्रदेश, झारखंड, मणिपूर, नागालँड, तसेच जम्मू-काश्मीरनेही अपघातात लक्षणीय घट नोंदवली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीतील तात्पुरत्या आकडेवारीनुसार, संबंधित कालावधीच्या तुलनेत गोव्यात २६६ अपघात कमी झाले. तसेच अपघाती मृत्यूंची संख्या २९ने कमी झाल्याची नोंद आहे. २०२४ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या दहा महिन्यांत २,२०८ अपघात झाले, तर २४२ अपघाती मृत्यू झाले. २०२५ मध्ये मात्र याच दहा महिन्यांत १,९४२ अपघात झाले, तर २१३ अपघाती मृत्यूंची नोंद झाली.
केवळ तीन महिन्यांत अपघातांचे प्रमाण सुमारे ९२ टक्क्यांनी, तर अपघाती मृत्यूंमध्ये ११ टक्क्यांनी घट झाली आहे. हा कल असाच पुढे टिकून राहिल्यास आगामी काळात रस्ते सुरक्षेत आणखी सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केरळमध्ये १३ अपघातांमागे एक मृत्यू
अहवालानुसार, देशात २०२४ मध्ये रस्ते अपघात आणि मृत्यूंमध्ये किंचित घट झाली. ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ४.७३ लाख अपघात आणि १.७० लाख मृत्यू नोंदवले गेले. २०२३ मध्ये ४.८० लाख अपघात आणि १.७३ लाख अपघाती मृत्यू झाले होते. गुजरात, हरियाणा आणि पंजाब यांसह नऊ राज्यांमध्ये अपघात आणि मृत्यू दोन्हीमध्ये घट झाली आहे. केरळने देशातील सर्वांत कमी अपघात तीव्रता नोंदवली असून प्रत्येक १३ अपघातांमागे एक मृत्यू इतका दर आहे.