वेदनादायी चित्र बदलावे

गोव्यात अपघातांची संख्या कमी होत आहे, ही सकारात्मक गोष्ट आहेच, पण होत असलेल्या अपघातांत मोठ्या प्रमाणात तरुणांचा बळी जात आहे. हे वेदनादायी चित्र बदलण्यासाठी सरकारच्या वाहतूक खात्याने आणि पोलिसांनी पुढाकार घ्यावा.

Story: संपादकीय |
3 hours ago
वेदनादायी चित्र बदलावे

गोव्यात रस्त्यांवरील अपघात आणि अपघाती मृत्यूंची संख्या इतर वर्षांपेक्षा कमी होत असली तरी काही पट्ट्यांमध्ये वारंवार होत असलेले अपघात चिंतेचा विषय बनला आहे. बांबोळी महामार्गाच्या पट्ट्यात आतापर्यंत शेकडो अपघात झाले असून, वीसपेक्षा जास्त लोकांचा एका वर्षात बळी गेला आहे. धारगळ, पेडणे परिसरात महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. रस्त्यांची सुधारणा झाली, विस्तार झाला, पण भीषण अपघात कमी होत नाहीत. गेल्या काही वर्षांतील अपघातांच्या तुलनेत गोव्यात गेल्या दहा महिन्यांत अपघात कमी झाले आहेत, पण भीषण अपघात आणि अपघाती मृत्यूंची संख्या वाढत आहे. दहा महिन्यांत १,९४२ अपघातांची नोंद झाली, ज्यात २१३ जणांचा मृ्त्यू झाला. याच कालावधीत गेल्या वर्षी २४२ जणांचे बळी गेले. यावर्षी आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत २६६ अपघात आणि २९ मृत्यू कमी आहेत. गोव्यातील काही भागांत वारंवार एकाच परिसरात अपघात होण्याचे आणि अपघातात मृत्यू येण्याचे प्रमाण वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. अपघात मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत तसेच देशातील इतर राज्यांच्या तुलनेतही गोव्यातील अपघात कमी होत असल्याची माहिती केंद्रीय महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या प्राथमिक अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

मंत्रालयाच्या प्राथमिक अहवालाप्रमाणे काही ठरावीक लहान राज्यांमध्ये अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. ज्यात गोवा, हिमाचल, झारखंड, मणिपूर, नागालँडचा समावेश आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये अपघात कमी झाले आहेत. गोव्याचाच विषय घेतला तर २०२५ मध्येही आतापर्यंतची संख्या पाहिली तर गोव्यातील अपघात मोठ्या प्रमाणात घटले आहेत. म्हणजे २०२४ मध्ये १ जानेवारी ते ३ नोव्हेंबरपर्यंत २,२०८ अपघातांची नोंद होती. या वर्षी या कालावधीत अपघातांची संख्या १,९४२ झाली आहे. म्हणजे अपघात आणि मृत्यू या दोन्हींची संख्या घटली आहे. गोव्यातील रस्त्यांमध्ये होत असलेली सुधारणा आणि वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांना याचे श्रेय द्यायला हवे. पण हे अपघात अजून कमी होऊन अपघाती मृत्यू येणार नाहीत, यासाठी काही उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे. बांबोळीच्या उतरणीवर झालेल्या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला आणि सेपक टाक्रॉ या खेळाच्या संघटनेचा अध्यक्ष व त्यांचा सहकारी त्यात मरण पावला. बांबोळीच्या टप्प्यात गेल्या वर्षभरात २१३ अपघात झाले असून २३ मृत्यू नोंदवले गेले आहेत. यावरून या रस्त्याच्या रचनेत काहीतरी निश्चितच त्रुटी राहिल्या आहेत, हे स्पष्ट होते. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित या रस्त्याचे पुनर्विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. या भागात अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, त्याचाही विचार व्हायला हवा. वाहतूक पोलीस, वाहतूक खाते यांनी अधिक सक्रिय होऊन रस्त्यांवर गस्त वाढवावी, वेगावर नियंत्रणासाठी वाहन चालकांना सूचना करणे, बेफिकीरपणे वाहने चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे तसेच अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करणे अशा गोष्टी व्हायला हव्यात. रेंट-अ-कॅबचे वाढते अपघात ही गोव्यातील दुसरीच समस्या आहे. ही समस्या नव्याने निर्माण होत असल्यामुळे आताच रेंट-अ-कॅबचा व्यवसाय करणाऱ्यांना सतर्क करण्याची गरज आहे. 

रस्त्यावर अपघात झाल्यानंतर त्यांना त्वरित वैद्यकीय मदत मिळेल, अशी व्यवस्था गोव्यात व्हायला हवी. रस्त्यांवरील अपघातांना रोखण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही उपाय करणे, विशेष सुविधा असलेल्या तसेच प्रशिक्षित कर्मचारी असलेल्या रुग्णवाहिका काही ठिकाणी तयार ठेवणे, अशा गोष्टी व्हायला हव्यात. रस्त्यावर अपघात झाल्यास तत्काळ वैद्यकीय मदत मिळणारी यंत्रणा गोव्यात अपुरी आहे. हा विषय सरकारने विचारात घेऊन अशा रुग्णवाहिका काही ठिकाणी ठेवण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे गोव्यात अपघात कमी होत आहेत, त्याच पद्धतीने अपघातांत मृत्यू येऊ नयेत यासाठी शक्य त्या गोष्टी करण्याची गरज आहे. यासाठी चालकांमध्ये जागृती करताना जखमींना वाचवण्यासाठीही उपाय झाले तर अनेकांचे जीव वाचू शकतात. गोव्यात अपघातांची संख्या कमी होत आहे, ही सकारात्मक गोष्ट आहेच, पण होत असलेल्या अपघातांत मोठ्या प्रमाणात तरुणांचा बळी जात आहे. हे वेदनादायी चित्र बदलण्यासाठी सरकारच्या वाहतूक खात्याने आणि पोलिसांनी पुढाकार घ्यावा.