मृतांमध्ये एका स्थानिकासह परप्रांतीय कामगाराचा समावेश

पणजी : साळगावात बुधवारी सकाळी घडलेल्या दुहेरी खुनाच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मुड्डोवाडा-साळगाव भागात घडलेल्या या घटनेत रिचर्ड नावाच्या स्थानिक तरुणाचा आणि एका परप्रांतीय कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, या दुहेरी हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी साळगावमधील मुड्डोवाडा परिसरात दोन मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली.
घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना दिसले की, दोघांनाही धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्यात आले होते. मृतांमध्ये स्थानिक रिचर्ड (पूर्ण नाव जाहीर होणे बाकी) तसेच एक परप्रांतीय बांधकाम कामगार यांचा समावेश आहे.
प्राथमिक तपासात दोघांचा मृत्यू मध्यरात्रीपासून पहाटेच्या सुमारास झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग, तसेच संघर्षाचे चिन्हे आढळल्याने ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करून पुरावे गोळा करण्यात आले.या परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय कामगारांची चौकशी सुरू आहे.
या दुहेरी हत्येमागे व्यक्तिगत वैर, कामाच्या ठिकाणी झालेला वाद, किंवा आर्थिक कारण असू शकते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे, तसेच मोबाइल कॉल रेकॉर्ड आणि स्थानिक साक्षीदारांच्या माहितीवरून तपासाचे धागेदोरे मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
साळगावात तणावाचे वातावरण
घटनेनंतर साळगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा मेडिकल कॉलेज (बांबोळी) येथे पाठविण्यात आले असून, शवचिकित्सा अहवाल आल्यानंतरच खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.