यावर्षी आतापर्यंत अपघातांची संख्या कमी; पण गोव्यातील रस्ते ठरू लागले प्राणघातक

१० महिन्यांत २०५ प्राणघातक अपघात २१२ जणांचा मृत्यू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
44 mins ago
यावर्षी  आतापर्यंत अपघातांची संख्या कमी; पण गोव्यातील रस्ते ठरू लागले प्राणघातक

पणजी : गोव्यात (Goa) यावर्षी रस्ते अपघातांच्या (Accident) संख्येत थोडीशी घट झाली असली तरी, गोव्यातील रस्ते प्राणघातक ठरू लागले आहेत.   जानेवारी ते ३ नोव्हेंबर दरम्यान सुमारे एक हजार, ९४२ (1942 accident)  अपघातांची नोंद झाली आहे. 

त्यापैकी बरेच अपघात अतिवेगाने, मद्यधुंद वाहन चालवणे आणि बेदरकारपणे किंवा निष्काळजीपणे वाहन चालवल्याने झाले आहेत.

गोवा वाहतूक पोलिसांच्या (Goa Traffic Police) अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान राज्यात २०५ प्राणघातक अपघातांची नोंद झाली आहे.

त्यात २१२ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या २२९ प्राणघातक अपघातांपेक्षा किंचित कमी आहे. गेल्या वर्षी २४१ जणांचा मृत्यू झाला होता.

 गंभीर अपघातांची संख्या गेल्या वर्षी १५१ वरून या वर्षी १८९ पर्यंत वाढली आहे.

आणि त्यांची तीव्रता ही गंभीर चिंतेची बाब बनली आहे. या महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांतच गोव्यात सुमारे १७ अपघात आणि दोन मृत्यू झाले. आणि सत्र सुरूच आहे. 

वाहतूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अतिवेगाने वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे आणि बेदरकारपणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे ही त्यामागील कारणे आहेत.

"किनारी पट्ट्यात आणि महामार्गांवर रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवण्याचे प्रमाण जास्त आहे. तथापि, रात्री उशिरापर्यंत गाडी चालवणाऱ्यांना थकव्यामुळे डोळा लागणे ही देखील चिंतेची बाब आहे," असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मंगळवारी बांबोळी येथे झालेल्या भीषण अपघाताने यावर प्रकाश टाकला आहे. भरधाव आलेल्या टँकरने रस्त्याच्या दुभाजकाला धडक देऊन नंतर लेन ओलांडून विरुद्ध बाजूला जाऊन ‘रेंट अ कार’ला धडक दिली.

त्यात अखिल भारतीय सेपक टाक्रॉ संघटनेचे योगेंद्र सिंग आणि खेळाडू अंकित कुमार बालियान यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चालक मद्याच्या नशेत नव्हता. मात्र, निष्काळजीपणे गाडी चालवल्याचे स्पष्ट झाले. चालक राहुल सरवदेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कारवाई केली.   

जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत, अधिकाऱ्यांनी अतिवेगाने गाडी चालवणाऱ्या १४,५०६, दारूच्या नशेत गाडी चालवल्याबद्दल ३,३६१ आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याबद्दल ८३ चलन दिली आहेत. दुचाकी अपघातांची संख्याही वाढती आहे. अपघात नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 



हेही वाचा