प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध

पणजी : निवडणूक ड्युटीवर (बीएलओ सुपरवायझर) उपस्थित न राहिल्याने, वीज खात्याच्या थिवी उपकेंद्रात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता स्वप्नील वालावलकर यांना अटक करण्यात आली आहे. ‘स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन’ ( एसआरए) ड्युटीसाठी गैरहजर राहिल्यामुळे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सुयश खांडेपारकर यांच्या निर्देशानुसार कोलवाळ पोलिसांनी अभियंत्याला थेट सबस्टेशनमधून ताब्यात घेतले.
हा प्रकार लक्षात येताच गुरुवारी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पाटकर यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा आरोप केला. राज्यात एसआयआरसाठी गॅझेटेट अधिकाऱ्यांनाही ड्युटी लागू केली आहे, मात्र उपजिल्हाधिकाऱ्यांकडून या अधिकाऱ्यांवर मुद्दाम दबाव आणला जात आहे. वीज उपकेंद्रातील सहाय्यक अभियंत्याला पोलिसांनी अटक करणे अत्यंत चुकीचे आहे. सरकारने पोलिसांना गुन्हेगारांच्या नव्हे, तर अधिकाऱ्यांच्या मागे लावावे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह पाटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि आदेश देणारे उपजिल्हाधिकारी तसेच त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
दरम्यान, वीज खात्याचे कार्यकारी अभियंता शेट्ये यांनी पणजी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अत्यावश्यक सेवेत असलेल्या वीज कर्मचाऱ्यांची नावे बीएलओच्या सेवेतून वगळून दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नावे घेण्याची विनंती केली आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याला अटक चुकीची
वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी या कारवाईबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. अभियंत्याला सबस्टेशनवरून घेऊन जाण्यास नकार दिल्यामुळे अहंकार दुखावलेल्या उपजिल्हाधिकारी सुयश खांडेपारकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून, अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याला कामावरून पोलिसांच्या मदतीने अटक करणे हे चुकीचे आहे.