जेनिटोची तीन वर्षांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित

शिरदोण किनाऱ्यावर २००९ मध्ये दोघांच्या मृत्यूचे प्रकरण : पुढील सुनावणी ८ डिसेंबर रोजी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
जेनिटोची तीन वर्षांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित

पणजी : शिरदोण समुद्रकिनाऱ्यावर २००९ मध्ये झालेल्या दोघांच्या मृत्यू प्रकरणी सत्र न्यायालयाने सराईत गुंड जेनिटो कार्दोझ याला सुनावण्यात आलेली तीन वर्षांची सक्तमजुरी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित ठेवली आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

शिरदोण समुद्रकिनाऱ्यावर खुनाची घटना १० मे २००९ रोजी घडली होती. जेनिटो कार्दोझ व त्याचे सहकारी महावीर नाडर, डॉम्निक नाझारेथ, सचिन पाडगावकर आणि प्रसाद कुबल यांचा प्रतिस्पर्धी मिरांड टोळीशी वाद झाला. यावेळी दोन्ही गटांतील सदस्यांनी एका शॅकजवळ एकमेकांवर काचेच्या बाटल्या आणि चाकूने हल्ला केला. या टोळीयुद्धात दुसऱ्या टोळीचे सदस्य संतोष कालेल आणि फ्रान्सिस मॅन्युएल डिसोझा ऊर्फ मिरांड यांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात जेनिटो कार्दोझ व इतरांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता. म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवले आणि तीन वर्षांची सक्तमजुरी ठोठावली. न्यायालयाने हा खून पूर्वनियोजित नसून, झालेल्या भांडणातून अचानक घडल्याचे निरीक्षण नोंदवले होते. या हल्ल्यात कार्दोझही जखमी झाला होता. त्याचे दोन सहकारी निर्दोष मुक्त झाले होते. सत्र न्यायालयाने सुनावलेली तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा गोवास्थित उच्च न्यायालयाने कायम ठेवली. यामुळे जेनिटोच्या अडचणीत भर पडल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या संदर्भात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असता, न्यायालयाने वरील शिक्षा स्थगित ठेवली. न्या. संजय करोल आणि न्या. नोंगमीकापम कोतीश्वर सिंग याच्या द्विसदस्यीय न्यायपीठाने हा आदेश दिला. तसेच पुढील सुनावणी ८ डिसेंबर रोजी ठेवली. जेनिटोतर्फे सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील मुकूल रस्तोगी, अात्माराम नाडकर्णी आणि वकील संतोष रिबेलो, मायकल नाझारेथ यांनी त्यांना साथ दिली.

जेनिटो सध्या न्यायालयीन कोठडीत

रामा काणकोणकर यांच्यावर करंझाळे येथे १८ सप्टेंबर रोजी प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणात जेनिटो कार्दोझ न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील जेनिटोसह आठही संशयितांना १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजया आंब्रे यांनी दिले आहेत. 

हेही वाचा