नावशी स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प वादग्रस्त ठरला होता

पणजी : राज्यातील वादग्रस्त मरीना प्रकल्प (Marina Project Goa) आता मुरगाव बंदरात हलवण्यात आला आहे. मरीना प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होईल. मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (MPA) अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकल्पाचे जेटी टर्मिनल (Jetty Terminal) पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे.
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी एमपीएने नौका आणि इतर प्रकारच्या पॉश बोटींना डॉक करण्यासाठी जेटी बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. एमपीएने प्रस्तावित केलेला मरीना प्रकल्प सुरूवातीला गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळामार्फत (आयपीबी) तिसवाडीतील नावशी गावात प्रस्तावित करण्यात आला होता.
तथापि, स्थानिक मच्छिमारांना फटका बसणार असल्याचा दावा करीत स्थानिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. विरोधामुळे आयपीबीने हा प्रकल्प स्थगित केला.
तथापि, या काळात एमपीएने मरीना प्रकल्प मुरगाव बंदरात हलवला. सूत्रांच्या मते, मरीना प्रकल्प मुरगावातील हेडलँड सडा येथील एमपीएच्या आयसीटी रेल्वे टर्मिनलच्या शेजारी होणार आहे.
१० जेटी बांधण्यासाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत आणि काम सुरू आहे. गोवा सरकार हा प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा, तत्त्वावर बांधत आहे.
हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने सुरू केला जाईल आणि पहिला टप्पा जानेवारी २०२६ मध्ये सुरू होईल. प्रकल्पाचे टर्मिनल पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. फक्त मरीनाकडे जाणारा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
मुंबईतील इंडिया मेरीटाईम वीक दरम्यान, एमपीएने २५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह जेटी बांधण्यासाठी मरिनटेक इंडिया सर्व्हिसेससोबत सामंजस्य करार (एमओयू) (MOU) केला आहे.