पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहणार; वेधशाळेचा अंदाज

पणजी: ऑक्टोबर महिन्यात पावसाने गोव्याचे 'कांडाप' काढले. मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे आपण जून-जुलै महिन्यातच आहोत की काय ? अशीही शंका अनेकांच्या मनात उद्भवली. दरम्यान आता गोव्यात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची शक्यता जवळपास ओसरली असल्याने कमाल आणि किमान तापमानामध्ये बऱ्याच प्रमाणात घट नोंदवली गेली आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे.
पावसाचा लेखाजोखा
आयएमडीने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, १ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या परतीचा मान्सूनच्या हंगामात गोव्यातील सर्व १४ पर्जन्यमापन केंद्रांवर सरासरी १० इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. यापैकी, पेडणे येथे सर्वाधिक २३ इंच पावसाची नोंद झाली आहे, तर सांगे येथे सर्वात कमी, म्हणजे १० इंच पाऊस झाला आहे.

थंडीत नैसर्गिक घट
ईशान्य मान्सून (ऑक्टोबर ते डिसेंबर) गोव्याच्या सरासरी वार्षिक पावसाच्या सुमारे ६.४% योगदान देतो. गेल्या काही दिवसांत पाऊस कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात कमाल तापमानात लक्षणीय घट दिसून येत आहे. पणजी आणि मुरगाव (Mormugao) येथील कमाल तापमान सुमारे २.४°C ने खाली आले असून, ते सध्या ३१°C च्या आसपास आहे. आज पणजीत २३°C तर मुरगावात सुमारे २३.२°C इतके तापमान नोंदवले. तसेच, आर्द्रता (Relative Humidity) पातळी पणजीत ९३% आणि मुरगावमध्ये ९०% अशी अजूनही उच्च आहे.

पुढील हवामान अंदाज
आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ८ ते १२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत उत्तर आणि दक्षिण गोव्यात कोरडे हवामान राहील. या अंदाजाने गोव्यात आता अधिकृतपणे हिवाळ्याची सुरुवात झाल्याचे संकेत दिले आहेत.